Wednesday, October 16, 2024

वृत्त क्र. 945

निवडणुकीच्या अनुषंगाने विविध बाबींवर निर्बंध 

आचारसंहितेत काय करावे काय न करावे जाणून घ्या ! 

नांदेड दि. 16 ऑक्टोबर :- जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 व 16 नांदेड लोकसभा पोटनिवडणूक-2024 च्या अनुषंगाने भारतीय  नागरीक  संरक्षण  संहिता 2023 चे कलम 163 अन्‍वये जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निवडणुकीच्या कालावधीमध्‍ये जिल्‍हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालये, सर्व तहसिल कार्यालये आणि सर्व शासकीय कार्यालये व विश्रामगृहे या ठिकाणी पुढील बाबी करण्‍यास विविध आदेशान्‍वये बंदी घातली आहे. 

विश्रामगृहावर बैठका बंद 

कोणत्‍याही प्रकारची मिरवणूक/मोर्चा काढणे, सभा घेणे, उपोषण करणे, सत्‍याग्रह करणे. कोणत्‍याही प्रकारच्‍या घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्‍हणने, इत्‍यादी. कोणत्‍याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यावर बंदी आहे. 

लाऊडडस्पिकर परवानगीशिवाय नाही 

कोणतीही व्‍यक्‍ती, संस्‍था पक्ष कार्यकर्ते यांना ध्‍वनीक्षेपकाचा (लाऊडस्पिकरचा) वापर सक्षम पोलीस अधिका-यांच्‍या पुर्व परवानगीशीवाय करता येणार नाही. फिरते वाहन रस्‍त्‍यावरुन धावत असतांना त्‍यावरील ध्‍वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. निवडणूक कालावधीत लाऊडस्पिकरचा वापर सकाळी 6 वाजेपुर्वी व रात्री 10 वाजेनंतर करता येणार नाही.

ताफ्यात फक्त गाड्या 

कोणत्‍याही वाहनांच्‍या ताफ्यामध्‍ये तीन पेक्षा जास्‍त मोटारगाडया अथवा वाहने (Cars/Vehicles) वापरण्‍यास या आदेशाद्वारे निर्बंध घालण्‍यात आले आहे.

पक्ष कार्यालये नियंत्रित 

जिल्‍ह्यातील धार्मिक स्‍थळे, रुग्‍णालये किंवा शैक्षणिक संस्‍था व सार्वजनिक ठिकाणाच्‍या जवळपास तात्‍पुरती पक्ष कार्यालये स्‍थापीत करता येणार नाही. वरील आदेश नांदेड जिल्‍ह्यासाठी निर्गमीत झाल्‍याच्‍या तारखेपासून दिनांक 27 नोव्‍हेंबर पर्यंत अंमलात राहतील.

मतदान केंद्र परिसरात कलम लागू

ज्‍याठिकाणी मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. त्‍याठिकाणापासून 200 मीटर परिसरात पक्षकारांना मंडपे उभारण्‍यास, दुकाने चालू ठेवण्‍यास  व  मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्‍वनीक्षेपके, इतर इलेक्‍ट्रॉनिक्‍स उपकरणे यांचा वापर करण्‍यास, संबंधीत पक्षांच्‍या चिन्‍हांचे  प्रदर्शन  करण्‍यास तसेच सर्व प्रकारचे फेरीवाले, निवडणुकीच्‍या कामाव्‍यतीरीक्‍त खाजगी वाहन व निवडणूकीच्‍या कामाव्‍यतीरीक्‍त इतर व्‍यक्‍तीस प्रवेश करण्‍यास याद्वारे प्रतिबंध करण्‍यात आले आहे. 

भाषण विनापरवानगी नाही 

संबंधीत पक्षांचे चित्रे, चिन्‍हांचे कापडी फलके, सार्वजनिक ठिकाणी भाषण देणे यावर याद्वारे निर्बंध घालण्‍यात आले आहेत. तसेच शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक मालमत्‍तेची प्रत्‍यक्ष किंवा अप्रत्‍यक्ष स्‍वरुपात विरुपता करण्‍यास  याद्वारे निर्बध घालण्‍यात आले आहे. 

नामनिर्देशनपत्र कार्यपद्धत 

नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळी कार्यालयाच्‍या परिसरात मिरवणूक, सभा घेणे, कोणत्‍याही प्रकारच्‍या घोषणा देणे, वाद्य वाजवणे किंवा गाणी म्‍हणने आणि कोणत्‍याही प्रकारचा निवडणूक प्रचार करणेस, तसेच वाहनाच्‍या ताफ्यामध्‍ये 3 पेक्षा जास्‍त वाहने निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाच्‍या 100 मिटरचे परिसरात आणणेस, तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्‍या दालनात नामनिर्देशनपत्र दाखल करण्‍यासाठी पाच व्‍यक्‍ती पेक्षा जास्‍त व्‍यक्‍तींना उपस्थित राहण्‍यास प्रतिबंध करण्यात आले आहे.  

मतमोजणी केंद्र परिसरात प्रतिबंध 

मतमोजणीची प्रक्रिया ही ज्‍या मतमोजणी केंद्रावर होणार आहे, त्‍या ठिकाणापासून 200 मीटर परिसरामध्‍ये मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्‍वनीक्षेपके, व इतर इलेक्‍ट्रॉनिक्‍स उपकरणे यांच्‍या वापरास व  मतमोजणीच्‍या कामाव्‍यतीरीक्‍त इतर व्‍यक्‍तीस प्रवेश करण्‍याकरीता प्रतिबंध करण्‍यात आले आहे. आदेश  23 नोव्‍हेंबर 2024 रोजी मतमोजनी सुरु झाल्‍यापासुन मतमोजणीचा कार्यक्रम पुर्ण होईपर्यंत अंमलात राहील.

शस्‍त्रास्‍त्रे बाळगण्‍यास बंदी

शासकीय कर्तव्‍य पार पाडणाऱ्या व्‍यक्‍ती, दंडाधिकारी शक्‍ती प्रदान केलेले अधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी, बँकेच्‍या सुरक्षा व्‍यवस्‍थेवरील अधिकारी व महाराष्‍ट्र शासन गृह विभाग यांचे दिनांक 20 सप्‍टेंबर 2014 च्‍या मार्गदर्शक सूचनानूसार जिल्‍हयातील छाननी समितीने वगळलेल्‍या शस्‍त्र परवानाधारका व्‍यतीरीक्‍त इतर सर्व परवाना धारक व्‍यक्‍तींना परवाना दिलेली शस्‍त्रास्‍त्रे वाहून नेण्‍यावर व शस्‍त्र बाळगण्‍यास  या आदेशान्‍वये प्रतिबंध करण्‍यात अर्थात बंदी घालण्‍यात आले आहे. 

जिल्‍हाधिकारी कार्यालयापुढे गर्दी नको

निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय (जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड) येथे नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत केवळ नामनिर्देशनपत्र दाखल करण्‍यासाठी येणा-या उमेदवारांच्‍या वाहनाच्‍या ताफ्यामध्‍ये तीन वाहने व शासकीय कर्तव्‍य पार पाडणारे शासकीय कर्मचारी, अधिकारी यांचे वाहने वगळता इतर सर्व वाहनास सदर रस्‍त्‍यावरुन वाहतुकीस याद्वारे प्रतिबंध  करण्‍यात येत आहे. 

परवानगी घेऊन छापा 

इतर उमेदवाराचे नाव व त्यांनी नेमुन देण्यात आलेले चिन्ह वापरणे. नमुना मतपत्रिकेसाठी आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे कागद वापरणे. आयोगाने निश्चित केलेल्या कागदाच्या आकारामध्ये नमुना मतपत्रिका छापणे या प्रमाणे नमुना मतपत्रिका छपाईस निवडणूक प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत 27 नोव्हेंबर 2024 पर्यंत निर्बंध घातले आहेत.  

 जातीचे मेळावे बंद 

जिल्ह्यात कुठेही कसल्याही प्रकारचे जात, भाषा, धार्मिक शिबीरांचे, मेळाव्यांचे आयोजनावर निवडणूक प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत 27 नोव्हेंबर पर्यंत निर्बंध घातले आहेत. निवडणूकीचे साहित्य कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर रहदारीस अडथळा होईल किंवा अपघात होईल अशा पध्दतीने लावण्यास निवडणूक प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत निर्बंध घातले आहेत. निवडणूकीचे प्रचारासाठी कोणत्याही व्यक्तीगत जागा, ईमारत, आवार, भिंत ईत्यादीचा संबंधीत जागा मालकाचे परवानगी शिवाय व संबंधीत परवाना देणाऱ्या प्राधिकरणाच्या परवानगी शिवाय वापर करण्यास निवडणूक प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत निर्बंध घातले आहेत. 

परवानगी शिवाय झेंडा नको 

फिरत्या वाहनांवर पक्ष प्रचाराचा झेंडा हा जिल्हाध्यक्ष उमेदवार व उमेदवाराचे निवडणूक प्रतिनिधी निवडणूक प्रचारासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडून अधिकृत परवानगी घेतलेल्या वाहनाव्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनांवर लावता येणार नाही. हे आदेश निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत 27 नोव्हेंबर पर्यंत अंमलात राहतील.  

 ध्वनीक्षेपकाच्या वापरावर निर्बंध 

ध्वनीक्षेपकाचा वापर पोलीस अधिकारी यांचे परवानगी शिवाय करता येणार नाही. सकाळी 6 वाजण्यापुर्वी आणि रात्री 10 वाजेनंतर कोणत्याही फिरत्या वाहनावर व कोणत्याही क्षेत्रात ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही. दिवसा प्रचाराकरिता फिरणाऱ्या वाहनांनी ध्वनीक्षेपकाचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबुनच करावा. ध्वनी क्षेपकाच्या आवाजासह फिरणाऱ्या वाहनास प्रतिबंध असेल. सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार आणि ईतर व्यक्तींनी निश्चीत ठिकाणी ध्वनी क्षेपकाच्या वापरा संबंधीत घेतलेल्या परवानगीची माहीती जिल्हादंडाधिकारी, संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधीत यंत्रणेस कळविणे बंधनकारक राहील. हे आदेश निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत 27 नोव्हेंबर 2024 पर्यंत) अंमलात राहतील. प्रत्येक ईसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलीस विभागाने जाहीर करुन त्यास प्रसिद्धी करावी असेही आदेशात स्पष्ट केले आहे.   

0000

#विधानसभानिवडणूक२०२४

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...