Wednesday, October 16, 2024

 #विधानसभानिवडणूक२०२४

वृत्त क्र. 944

 

40 दिवसांसाठी 24 तास सतर्क रहा : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

·         प्रशासन इलेक्शन मोडमध्ये ;नोडल अधिकाऱ्यांची मॅरेथॉन बैठक

·         नाकाबंदी सुरू ; होर्डिंग काढणे, फलके साफ करण्याला गती

·         कर्मचाऱ्यांनो ! मुख्यालय सोडू नका ; मोबाईल बंद ठेवू नका

·         विधानसभा,लोकसभा निवडणूक समर्थपणे यशस्वी करण्याचे आवाहन

 

नांदेड दि. 16 ऑक्टोबर : विधानसभा निवडणूक व लोकसभा पोटनिवडणुकीसाठी प्रशासन 'इलेक्शन मोड 'मध्ये आले आहे. सर्व नोडल अधिकारी, जिल्हा परिषद महानगरपालिका पोलीस विभागाच्या जवळपास 70 शीर्षस्थ अधिकाऱ्यांची आज मॅरेथॉन बैठक झाली. यामध्ये 40 दिवस 24 तास सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सर्व अधिकाऱ्यांना केले.

 

नियोजन भवनाच्या कॅबिनेट हॉलमध्ये आज झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी निवडणूक आयोगाने दिलेले स्पष्ट निर्देश पुन्हा एकदा सर्वांच्या लक्षात आणून दिले. निवडणूक आयोगाने यावर्षी मतदार संख्या वाढविण्याचे नाकाबंदी काटेकोर करण्याचे निर्देश दिले आहे.

 

त्यामुळे निवडणूक काळामध्ये काळा पैशाची होणारी देवाणघेवाण, दारू, अन्य अमली पदार्थ, पैशाची देवाणघेवाण, भेट वस्तूंचे वाटप यावर नियंत्रण आणण्याचे निर्देश दिले आहे. यासोबतच बिनचूक सर्व निवडणूक प्रक्रिया पारदर्शी राबविण्यासाठी आयोग आग्रही आहे. त्याप्रमाणे जिल्ह्यातील नियोजन करण्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप माळोदे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्यासह जवळपास 70 विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

 

24 तासात 36 तासात व 72 तासात काय करावे याबाबत निवडणूक आयोगाने स्पष्ट संदेश दिले आहे. त्या सर्व कर्तव्याची पूर्तीचा आढावा या वेळेस घेण्यात आला. होर्डिंग मोठ्या प्रमाणात काढण्यात यावे.कोणत्याही कार्यालयामध्ये दर्शनी भागात कोणत्याही राजकीय व्यक्तीचे व मतदारावर प्रभाव टाकणारे कोणतेही साहित्य राहणार नाही, याची काळजी घेण्याची यावेळी स्पष्ट करण्यात आले.

 

शासकीय आदेश काढू नका

आचारसंहिता लागली असल्यामुळे कोणतीही नवीन तांत्रिक मंजुरी, प्रशासकीय मंजुरी, देण्यात येऊ नये. तसेच कार्यालयीन आवक जावक मध्ये कोणत्याही पत्राची देवाणघेवाण होता कामा नये, नवे आदेश, कामे सुरू करू नये. सर्व विभाग प्रमुखांनी आजच्या तारखांमध्ये कार्यालयीन कामकाज बंद करावे, तसेच अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कर्मचाऱ्यांनी निवडणुकीच्या कामांमध्ये स्वतःला झोकून द्यावे,या काळामध्ये कोणालाही विनापरवानगी मुख्यालय सोडू नका असे स्पष्ट करण्यात आले.

 

ड्युटीत बदल होणार नाही

निवडणूक हे राष्ट्रीय कर्तव्य असून या यंत्रणेसाठी सर्वोच्च कार्य आहे. त्यामुळे दिलेले काम नाकारणे. सोपवलेल्या कार्यभार परस्पर बदलणे. अधिकाऱ्यांवर दबाव आणणे अशा प्रकारचा कोणताही प्रकार अधिकारी कर्मचाऱ्यांनी करू नये. केवळ दोन दिवसांच्या कामासाठी वेगवेगळी कारणे सांगणाऱ्या व टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. ड्युटी बदलवण्यासाठी दबाव आणणे, मागणी करणे त्यासाठी प्रयत्न करणे,कोणत्याही कर्मचाऱ्यांनी करू नये, असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. निवडणूक कार्यात हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले

 

निवडणूक आयोग सर्वोच्च

वडणूक काळात तालुका स्तरावर काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या स्पष्ट सूचनांचे पालन करावे. त्यांनी जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांच्या आदेशाची वाट पाहू नये. निवडणूक काळामध्ये सर्व अधिकारी भारत निवडणूक आयोगाच्या अधिपत्यात येतात. आयोगाच्या निवडणुकांबाबतच्या स्पष्ट सूचना आहे. अतिशय कणखर व कडकपणे या सूचनांचे पालन करावे. त्याच पद्धतीने कोणाचाही दबाव न घेता कोणाच्याही आमिषाला बळी न पडता सक्त कारवाई करावी, असे निर्देशही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तालुकास्तरावरील उपजिल्हाधिकारी हे निवडणूक अधिकारी असून त्यांच्या नेतृत्वात सक्षमतेने काम करण्याचे स्पष्ट केले.

 

जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी यावेळी दोन्ही निवडणुका एकाच वेळी होत असल्याचे स्पष्ट केले. महाराष्ट्रात एकाच वेळी 288 ठिकाणी निवडणुका होत असल्याने या काळात अन्य जिल्ह्यातील अतिरिक्त पोलीस कुमक मिळणार नाही. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळामध्ये पोलीस विभागाने सक्षमतेने कार्य करण्याचे आवाहन केले. सी व्हिजिल अॅपमुळे वेळेत प्रतिसाद देणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे त्यामुळे भरारी पथक व स्थिर निगराणी पथकाने पोलीस दलाशी योग्य समन्वय राखण्याचे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

 होर्डींग बॅनर विनापरवानगी नको

महानगरपालिका क्षेत्रातील सर्व खाजगी होर्डिंग बॅनर आजच्या आज काढून टाकण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. महानगरपालिका आयुक्तांनी या संदर्भातील कार्यवाही सुरू असून उद्यापर्यंत हे कार्य पूर्ण होईल असे स्पष्ट केले. तसेच या काळामध्ये कोणीही विनापरवानगी होर्डिंग बॅनर लावू नये, तसे केल्यास कारवाई करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.

 

विश्रामगृहे तहसिलदारांकडे

निवडणूक निरीक्षक प्रत्येक विधानसभा  क्षेत्रामध्ये या काळात येणार आहे. त्यामुळे तालुक्याचे सर्व विश्रामगृह अद्यावत करण्याचे निर्देश यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले. या काळात संबंधित तहसीलदारांना विश्रामगृहासंदर्भातील निर्णय घेऊ देण्याचे निर्देश देण्यात आले.

 

मतदारसंघात मतमोजणी

यावेळी मतमोजणी प्रत्येक विधानसभा क्षेत्रात होणार आहे. लोकसभेची मतमोजणी विद्यापीठ परिसरात तर नांदेड उत्तर व नांदेड दक्षिणची मतमोजणी तंत्रनिकेतन मध्ये होणार आहे. या ठिकाणी देखील व्यवस्था करण्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

 

छापेमारी, जप्ती प्रमाण वाढवा

स्थिर निगराणी पथक व भरारी पथकांच्या कारवाईवर जिल्ह्यातील निवडणुकांच्या सक्त कारवाईचे निकष लागतात. त्यामुळे या पथकातील कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण द्या. कार्य तत्पर कर्मचाऱ्यांची नेमणूक करा. मोठ्या प्रमाणामध्ये नाकाबंदी आणि अवैध दारू, पैसा पकडल्या गेला पाहिजे. सामान्य नागरिकांना या काळामध्ये कोणताही त्रास न होता त्यांच्यावर कोणाचाही प्रभाव नसला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

 स्वीपचे कार्य दुप्पटीने वाढवा

 मतदान प्रक्रियेमध्ये प्रत्येक नागरिकांना सहभागी व्हावे वाटेल अशा पद्धतीने प्रत्येक मतदान केंद्र सर्व सोयीने तयार ठेवा. या काळामध्ये मतदान करणे या राष्ट्रीय कर्तव्यामध्ये नागरिकांना उस्फूर्तपणे सहभागी करून घ्या. यावेळी नांदेड जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी मोठ्या प्रमाणात असेल यासाठी स्वीप चमूने दुप्पट जोमाने काम करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

00000










No comments:

Post a Comment

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...