Thursday, December 15, 2022

 दिव्यांगांना सहानुभुती म्हणून नव्हे तर

अंगभुत कलागुणांच्या विकासासाठी संधी आवश्यक

-         जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

दोन दिवसीय दिव्यांग क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा समारोप

जिल्ह्यातील 75 शाळांमधून 541 स्पर्धक सहभागी

 

नांदेड, (जिमाका) दि. 15 :- इतर सक्षम व्यक्ती प्रमाणेच दिव्यांगांच्या मनात आत्मविश्वास जागृत असतो. त्यांच्याकडे पाहतांना आपल्या सहानुभुतीची गरज नसते. वाट्याला आलेल्या दिव्यंगत्वावर त्यांनी त्यावर मात करून त्यांनी जे कौशल्य विकसीत केलेले असते ते अधिक लाखमोलाचे असते. त्यांच्या अंगी असलेल्या अंगभुत कलागुणांना वाव मिळावा, त्याचा विकास व्हावा यादृष्टिने क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांसारखे विविध उपक्रम वारंवार उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.  

 

येथील डॉ. शंकरराव चव्हाण सभागृहात सांस्कृतिक स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. या समारंभास जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप माळोदे, अपर जिल्हाधिकारी बोरगावकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी दिव्यांगप्रती कर्तव्य तत्पर असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. यात संत बाबा सुखदेव सिंघजी, डॉ. लक्ष्मीकांत बजाज, डॉ. अर्चना बजाज, कमल कोठारी, ॲड दिलीप ठाकूर, नेरली कुष्ठधामचे मनोहर जाधव, प्रेमकुमार फेरवाणी यांचा समावेश आहे. संत बाबा सुखदेवसिंघजी यांच्यावतीने त्यांच्या अनुयायींनी सन्मान स्विकारला.

 

या स्पर्धेत अंध, मतिमंद, अस्थिव्यंग व मुकबधीर अशा एकुण जिल्ह्यातील 75 शाळांचा समावेश होता. किनवट येथील अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वंदे मातरम स्वागत गीत सादर केले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गितांवर, लावणी व इतर गाण्यांवर आपले नृत्य सादर केले. विजेत्या स्पर्धकांना व शाळांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेसाठी राजेश कपुर, चंद्रकांत अटकळीकर, पंजाबराव अंबोरे यांनी सांस्कृतिक स्पर्धेचे परिक्षक म्हणून काम पाहिले.

0000 








No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...