बांबू लागवड मोहिमेचा जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या हस्ते शुभारंभ
धनेगाव येथे
1 हजार बांबु रोपांची लागवड
नांदेड (जिमाका) दि. 28 :- जिल्हा फळरोप वाटीका धनेगाव येथे राज्य शासनाचा कृषी विभाग व वृक्षमित्र फाऊंडेशन नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बांबू लागवड मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे हस्ते आज करण्यात आला.
बांबू लागवड विषयी प्रचार प्रसिद्धी व्हावी म्हणून यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. आज बांबू लागवड मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या हस्ते जिल्हा फळरोप वाटीका धनेगाव येथील प्रक्षेत्रावर 1 हजार बांबू रोपट्यांची लागवड करण्यात आली. हे बांबु रोपे वृक्षमित्र फाऊंडेशन मार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
पर्यावरणातील बांबूचे महत्त्व सांगून जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी बांबूपासून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अतिरिक्त आर्थिक लाभाविषयी माहिती दिली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गोदावरी, पैनगंगा, मन्याड आसना आदी नदी काठावरील भागात सामूहिक तसेच वैयक्तिक शेतकऱ्यांच्या शेतावर बांबू लागवड करावी असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या हस्ते बांबु रोपे देण्यात आली.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी यावर्षी जिल्ह्यात 1 हजार एकर क्षेत्रावर बांबू लागवडीचे नियोजन करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच कृषी विभाग व वृक्षमित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विभागाच्या, रोपवाटिका तसेच तालुका बीज गुणन केंद्र, कृषी चिकित्सालय आदी क्षेत्रावर 5 हजार बांबूची झाडे लावण्याचे नियोजन केले असून झाडे लागवडीस सुरुवात झाल्याचे त्यांनी सांगितले.
बांबू लागवड मोहिमेच्या या शुभारंभ प्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी रविकुमार सुखदेव यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोक्रा) योजनेंतर्गत शेतकऱ्यास वैयक्तिक लागवडीसाठी लक्षांक व अनुदान उपलब्ध असल्याचे सांगून शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन केले.
यावेळी नांदेडचे तालुका कृषी अधिकारी
सिद्धेश्वर मोकळे, कृषी
अधिकारी सानप, कृषी पर्यवेक्षक गोपाळ चामे, वृक्षमित्र फाउंडेशनचे संतोष मुगटकर आदीसह कृषी सहायक वसंत जारीकोटे,
चंद्रकांत भंडारे, श्रीमती देशमुख प्रतिभा, कोलगिरे वर्षा, बोराळे यांची उपस्थिती होती.
*****
No comments:
Post a Comment