Wednesday, July 28, 2021

 

अकरावीच्या सामाईक प्रवेश परीक्षेचे  ऑनलाईन अर्ज करण्यास 2 ऑगस्टची मुदत   

नांदेड (जिमाका) दि. 28 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत शासन निर्णय 28 मे व 24 जून 2021 नुसार इयत्ता 11 वी प्रवेशासंदर्भात राज्यात सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) चे आयोजन करण्यात आले आहे. राज्य मंडळाची इयत्ता 10 वी परीक्षा सन 2021 पूर्वी उत्तीर्ण / प्रविष्ठ झालेले विद्यार्थी आणि सीबीएसई, आयसीएसई व अन्य मंडळांच्या विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने बुधवार 28 जुलै पासून 2 ऑगस्ट 2021 अखेर रात्री 11.59 पर्यंत https://cet.11thadmission.org.in या संकेतस्थळावरुन भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सामाईक प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 178 रुपये अधिक बँकिंग चार्जेस / पेमेंट गेटवे चार्जेस असे शुल्क भरावे लागणार आहे. यासाठी पेमेंट गेटवेची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

 संगणक प्रणालीमध्ये अर्ज भरण्यासाठी पुढील माहिती नोंदवावी लागणार आहे. ई-मेल आयडी (उपलब्ध असल्यास), मोबाईल क्रमांक नोंदविणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांने परीक्षेचे माध्यम नोंदविणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याने सेमी इंग्रजीचा विकल्प निवडल्यास त्याला इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयांच्या प्रश्नांसाठी इंग्रजी माध्यम असेल परंतू सामाजिक शास्त्रे- इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल या विषयासाठी विद्यार्थ्यास अन्य एक माध्यम निश्चित करावे लागेल. 

राज्यमंडळाची इयत्ता 10 वी परीक्षा सन 2021 पूर्वी उत्तीर्ण, प्रविष्ठ झालेले विद्यार्थी आणि सीबीएसई, आयसीएसई व अन्य मंडळांचे विद्यार्थी इत्यादींनी फोटो आयडी, पासपोर्ट साईज फोटो, नमुना स्वाक्षरी इत्यादी कागदपत्रे स्कॅन करुन संगणक प्रणालीत अपलोड करावी लागणार आहेत. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यास त्याच्या तात्पुरत्या / कायमच्या निवासस्थानाच्या पत्त्यानुसार परीक्षा केंद्र मिळण्यासाठी जिल्हा व तालुका / शहराचा विभाग निश्चित करावा लागेल. दिव्यांग विद्यार्थ्यांनी अर्ज दिव्यांगत्वाचा प्रकार निवडून निश्चित करावा तसेच त्याबाबतची आवश्यक कागदपत्रे संगणक प्रणालीत अपलोड करावी लागतील. प्रथम आवश्यक माहिती तयार / निश्तिच करुन ठेवावी व त्यानंतर इयत्ता 11 वी प्रवेशासाठी आयोजित सामाईक प्रवेश परीक्षेचे अर्ज भरण्याची कार्यवाही करावी. 

ज्या विद्यार्थ्यांनी 20 व 21 जुलै कालावधीत संपूर्ण प्रक्रिया करुन सामाजिक प्रवेश परीक्षेसाठी मंडळाकडे अर्ज सादर केले आहेत त्यांना आपल्या अर्जाचा तपशील पूर्वीचा अर्ज क्रमांक व अर्ज भरताना नोंदविलेला मोबाईल क्रमांक टाकून संकेतस्थळावर पाहता येईल. या प्रक्रियेदरम्यान परिपूर्ण अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. मात्र प्रक्रिया पूर्ण करुन न शकलेल्या उमेदवारांचा तपशील संकेतस्थळावर उपलब्ध नसल्यास त्यांनी नव्याने अर्ज सादर करणे आवश्यक राहिल. 

सामाईक प्रवेश परीक्षेसंदर्भात विद्यार्थी, पालक व अन्य संबंधित घटकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी मंडळामार्फत यापूर्वी हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्याचा तपशील मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना या प्रक्रियेच्या तांत्रिक बाबीसंदर्भात अडचणी असल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी 9823 0098 41 या टोल फ्री क्रमांकावर सकाळी 10 ते सायं 7 यावेळेत संपर्क साधावा. हा क्रमांक संकेतस्थळावर होम पेजवर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. 

राज्यमंडळाची इयत्ता 10 वी परीक्षा सन 2021 पूर्वी उत्तीर्ण / प्रविष्ठ झालेले विद्यार्थी आणि सीबीएसई, आयसीएसई व अन्य मंडळांचे विद्यार्थी, पालक व संबंधित अन्य घटकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.

*****

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...