Wednesday, July 28, 2021

 

विमा कंपनीने तात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाईबाबत कार्यवाही करावी

-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर 

नांदेड (जिमाका) दि. 27 :- नांदेड जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती अंतर्गत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत व ऑफलाईन अर्ज केलेले आहेत अशा एकुण 1 लाख 14 हजार 825 प्रकरणांबाबत संबंधित विमा कंपनीने तात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईबाबत त्वरीत कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले. 

जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्ती अंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजनेची आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. या बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी एस. बी. नादरे, कापूस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. बी. व्ही. भेदे, कृषि विज्ञान केंद्र पोखर्णीचे शास्त्रज्ञ डॉ. डी. ए. देशमुख, विमा कंपनीचे प्रतिनिधी सौरभ पारगल, शैलेंद्र शर्मा, रवी थोरात, गौतम कदम, नांदेड व देगलूरचे उपविभागीय कृषि अधिकारी आदी उपस्थित होते. 

शेतकऱ्यांना केलेल्या आवाहनानंतर नैसर्गिक आपत्तीतून दिलासा मिळावा या उद्देशाने अनेक शेतकऱ्यांने पुढे येऊन पीक विमा काढलेला आहे. नैसर्गिक आपत्तीतून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सावरण्यासाठी पीक विमा हा मोठा आधार आहे. परिस्थितीचे गांभीर्य विमा कंपनीने लक्षात घेऊन जिल्ह्यातील 1 लाख 14 हजार 825 अर्जांचा तात्काळ निपटारा करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत विमा कंपनीकडील प्राप्त अर्जांवर कृषि विभागाच्या समक्ष तात्काळ पंचनामे करुन संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी विमा कंपनीला दिल्या. 

पुढील काळात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान आल्यास विमाधारक शेतकऱ्यांनी टोल फ्री क्रमांक 1800 103 5490 तसेच पिक विमा ॲपच्या माध्यमातून व ईमेल supportagri@iffcotokio.co.in द्वारे किंवा कृषि व महसूल विभागात प्रत्यक्ष अर्ज देऊन 72 तासात नुकसानीची पूर्व सूचना शेतकऱ्यांनी द्यावी, असे आवाहन  जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी यावेळी केले.

*****

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...