Monday, September 9, 2024

 वृत्त क्र. 823 

कापूस पिकावरील आकस्मिक मर रोगावर उपाययोजना 

नांदेड दि. 9 सप्टेंबर :- सद्य परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी तथा मुसळधार पावसामुळे कपाशीवर आकस्मिक मर (पॅराविल्ट) हा रोग दिसून येत आहे. साधारणतः आकस्मिक मर ही विकृती पिक फुलोरा अवस्थेत तसेच बोंडे परिपक्व झालेले असताना अधिक प्रमाणात दिसून येते. पावसाच्या मोठ्या खंडामुळे, कपाशी पिकास पावसाचा तान बसल्यास व त्यानंतर लगेच मोठ्या पावसामुळे निर्माण झालेले जमिनीतील आर्द्रता व साचलेले पाणी यामुळे आकस्मिक मर या विकृतीचा कापूस पिकावर प्रादुर्भाव दिसून येतो. 

आकस्मिक मर या विकृतीमुळे कापसाच्या झाडातील तेजपणा नाहीसा होऊन झाड एकदम मलूल तथा सुकल्यासारखे दिसते. तसेच त्यानंतर प्रादुर्भावग्रस्त कपाशीची सर्व पाने फुले खालच्या दिशेने वाकतात किंवा पिवळे पडतात. तसेच पात्या, फुले व अपरिपक्व बोंडे सुकून गळतात. अपरिपक्व अवस्थेतच बोंडे उमलल्याचे आढळते. रोगट झाडाची मूळे कुजत नाहीत. रोगग्रस्त झाडास हमखास नविन फूट येते. 

आकस्मिक मर: उपाय योजना

कापूस पिकाच्या वाढीच्या मुख्य अवस्थेत सिंचनाची सोय उपलब्ध असल्यास पाणी द्यावे. पिकास प्रदीर्घ पाण्याचा ताण पडू देऊ नये. अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. साचलेले पाणी चर काढून त्वरित शेताबाहेर काढून टाकावे. शेतातील पावसाच्या पाण्याचा व्यवस्थित निचरा होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आकस्मिक मर या विकृतीचे लक्षणे दिसलेल्या झाडाच्या मुळाशी खालील पैकी आळवणी (ड्रेचिंग) करावी. यासाठी पुढील पैकी एका बुरशीनाशकाचा वापर करावा. कॉपर ऑक्सीक्लोराइड (25 ग्रॅम) किंवा कार्बेन्डाझीम (10 ग्रॅम) + युरिया (200 ग्रॅम ) / 10 लीटर पाणी या प्रमाणात द्रावण करून प्रती झाडास 250-500 मिली द्रावणाची झाडाच्या मुळाशी आळवणी (ड्रेचिंग) करावी. त्यानंतर 8 ते 10 दिवसांनी 2 टक्के डीएपी (200 ग्रॅम / 10 लि. पाणी) याची आळवणी (ड्रेचिंग) करून लगेच हलके पाणी द्यावे, हा कृषि संदेश कृषि कार्यालयाच्यावतीने दिला आहे.

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...