छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेला दृढ करण्यासाठी शासन कटिबद्ध
- पालकमंत्री गिरीश महाजन यांचा संदेश
समाजाच्या प्रेरणेसाठी शिवस्वराज्य दिन महत्वाचा
- खासदार प्रताप पाटील चिखलीकर
जिल्हा परिषदेत शिवराज्य दिन उत्साहात साजरा
नांदेड (जिमाका) दि. 6 :- राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत पातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत आज “शिवस्वराज्य दिन” साजरा होत आहे याचा आम्हाला आनंद आहे. राज्य शासनाने समाजातील सर्व घटकांना प्रेरणा मिळावी यादृष्टीने या उपक्रमाकडे एक प्रेरणादायी उपक्रम म्हणून पाहावे लागेल. महाराष्ट्राची अस्मिता म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जगदंब तलवारीकडे पाहतो, ती तलवार आणि वाघनखे राज्यात परत आणण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला असून या प्रयत्नांना लवकरच यश मिळेल असा विश्वास, खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केला.
जिल्हा परिषदेच्या प्रांगणात “शिवस्वराज्य दिन” सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार राम पाटील रातोळीकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर घुगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, पोलीस उपविभागीय अधिकारी अश्विनी जगताप, कामाजी पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या प्रेरणेचे मुख्य स्त्रोत आहे. त्यांच्या जीवन कार्यातून प्रेरणा घ्यावी यासाठी राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाला या विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेला पुढाकार महत्वाचा असल्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी शासनाने घेतलेल्या या पुढाकाराला अधोरेखीत केले. यावेळी आमदार राम पाटील रातोळीकर यांनी समयोचित भाषण करून शुभेच्छा दिल्या. संतोष देवराये यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर आपल्या भावना व्यक्त केल्या.
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर लोककल्याणकारी राज्याचा बाणा जपला. हाच बाणा स्थानिक स्वराज्य संस्थांनी जपण्याला प्राधान्य देऊन सामाजिक न्यायाची संकल्पना अधिक भक्कम केली पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या शुभसंदेशाचे वाचन करण्यात आले.
छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेला दृढ करण्यासाठी शासन कटिबद्ध
पालकमंत्री गिरीश महाजन यांचा संदेश
इतिहासाच्या पानात डोकावून पाहिले तर मुघलांनी प्रजेवर राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या जुलूम, जबरदस्ती, अत्याचार, अन्याय केल्याचे दाखले पानोपानी मिळतात. मुघलांच्या अन्यायामुळे महाराष्ट्र खचून गेला होता. या राज्याला स्वराज्याच्या स्वरुपात आणण्याचे धैर्य छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखविले. माझ्या रयतेवर कोणाची वाईट नजर पडणार नाही, माझ्या आई-बहिणी-लेकीबाळींवर कोणी अत्याचार करणार नाही याचा आदर्श मापदंड छत्रपती शिवरायांनी आपल्या जीवन कार्यातून निर्माण केला. शेतकऱ्यांकडून कोणी दडपशाहीने शेतसारा वसूल करणार नाही, माझी रयत, माझी प्रजा स्वतंत्र असेल एवढा व्यापक विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. छत्रपती शिवरायांच्या या स्वराज्य संकल्पनेला दृढ करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या शुभेच्छा संदेशाद्वारे सांगितले.
शिवराज्याभिषेक करतांना हाच उद्देश त्यांनी जपला. या उद्देशाला दृढ करण्यासाठी शासनातर्फे आपण विविध उपक्रम राबवित आहोत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड येथे जाऊन राज्यातील प्रजेच्या कल्याणासाठी ही कटिबद्धता आणखी दृढ केली आहे. लोककल्याणकारी राज्यासाठी आपण सर्व हा “शिवस्वराज्य दिन” अधिक व्यापक करू, असे त्यांनी आपल्या शुभसंदेशात सांगितले.
00000
No comments:
Post a Comment