Friday, January 5, 2018

विष्णुपुरी प्रकल्पातील पाणी पाळीसाठी
बागायतदारांना अर्ज करण्याचे आवाहन  
नांदेड, दि. 5 :- शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पात 15 ऑक्टोंबर रोजी उपयुक्त साठ्यावर रब्बी हंगाम सन 2017-18 साठी तीन पाणी पाळ्या देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यातील प्रथम पाणी पाळी 23 डिसेंबर रोजी सुरु झाली असून दुसरी 20 जानेवारी व तिसरी 20 फेब्रुवारी रोजी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील बागायतदारांनी नमुना नं. 7 व 7 अ मध्ये पाणी अर्ज करावीत, असे आवाहन नांदेड पाटबंधारे विभाग (उ.) कार्यकारी अभियंता आर. एम. देशमुख यांनी केले आहे.
बागायतदारांना पाणी अर्जाचा विहित नमुना संबंधीत शाखा कार्यालयात विनामुल्य मिळेल. पाणी अर्जात पिकाची मागणी विस आरच्या पटीत नोंदवावी. अर्जातील पुर्ण माहिती भरुन पाणी अर्ज कार्यालयीन वेळेत शाखा कार्यालयात सादर करुन पोच पावती घ्यावी. पाणी अर्ज भरतेवेळेस थकबाकीदार लाभधारकांनी मागील थकबाकी व चालू पिकाची अग्रीम पाणीपट्टी भरुन सहकार्य करावे म्हणजे दिलेला पाणी अर्ज मंजूर होईल. नियमानुसार पाणीपट्टी भरणा न केल्यास पाणी अर्ज नामंजूर होईल तेंव्हा नामंजूर क्षेत्रास कालव्याद्वारे पाणी पुरवठा करणे बंधनकारक राहणार नाही. मंजूर क्षेत्रास कालव्याचे पाणी अग्रक्रमाने देण्यात येईल. नामंजूर व अनाधिकृत क्षेत्रास कालव्याचे पाणी देण्याची जबाबदारी पाटबंधारे विभागावर राहणार नाही. मंजुरी घेवूनच पिकाचे नियोजन करावे. प्रत्येक लाभधारकांना ठरवून दिलेल्या तारखेप्रमाणेच पिकास पाणी घ्यावे तसेच दिवस-रात्र पाणी घेणे बंधनकारक आहे. दिवसा किंवा रात्री जेंव्हा पाणी पाळी येईल तेंव्हा पाणी घेतले नाही तर नदी, नाल्यास पाणी वाया जाते, त्यामुळे सिंचनाचा कालावधी वाढतो. पर्यायाने पाणी पाळी अंतरात वाढ होते. त्यामुळे असे पाणी वाया गेल्यास मुदतीत पाणी देणे शक्य होणार नाही व त्याची जबाबदारी या कार्यालयास राहणार नाही, याची सर्व लाभधारकांनी नोंद घ्यावी. सिंचन करतेवेळी मंजूर क्षेत्राचा पास जवळ ठेवावा. कमी पाण्यात व कमी वेळात सिंचन करुन राष्ट्रीय जलसंपत्तीचा काटेकोरपणे वापर करावा. पाणी नाश कटाक्षाणे टाळावा. जलसंपदा विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयातील तरतुदी नुसार सर्व शर्ती व अटी बंधनकारक राहतील याची सर्व लाभधारकांनी नोंद घ्यावी, असेही आवाहन कार्यकारी अभियंता आर. एम. देशमुख यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात मागील 4 वर्षातील जिल्हा क्रीडा पुरस्काराचे होणार वितरण

  76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात मागील 4 वर्षातील जिल्हा क्रीडा पुरस्काराचे होणार वितरण     नांदेड, दि. 25 जानेवारी :- ...