Thursday, August 11, 2022

 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त

देगलूरमध्ये  विविध कार्यक्रमाचे आयोजन 

 

सर्वांनी उपस्थित राहावे तहसीलदार राजाभाऊ कदम यांचे आवाहन 

 

नांदेड (जिमाका), दि. 11 :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण देशभर अतिशय उत्साहात साजरा करण्यात येत आहे. देगलूरमध्ये देखील यानिमित्त दिनांक 12, 13, व 14 ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्या सर्व कार्यक्रमाची जय्यत तयारी झाली असून शहरातील जास्तीत जास्त  नागरिकांनी, शालेय व  महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींनी यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन तहसीलदार राजाभाऊ कदम यांनी केले. ते नियोजन बैठकीत बोलत होते. यावेळी आमदार जितेश अंतापुरकर पोलीस निरीक्षक सोहन माछरे, मुख्याधिकारी गंगाधर इरलोड, गटविकास अधिकारी शेखर देशमुख हे उपस्थित होते.

 

दिनांक 12 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वा. सायकल रॅली देगलूर कॉलेज ते  मुख्य रस्त्यावरून  तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे. दुपारी तहसील कार्यालयात 75 कुटुंबप्रमुखांना नवीन रेशन कार्डचे  वाटप करण्यात येणार आहे. तसेच 75 नागरिकांचे मतदान कार्ड आधार लिंकशी जोडण्यात येणार आहेत. दिनांक 13 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता प्रभात फेरीचे आयोजन केले असून ही प्रभात फेरी अण्णाभाऊ साठे चौक येथून सुरू होऊन मुख्य बाजारपेठेतून तहसील कार्यालयासमोर समारोप होणार आहे. दिनांक 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता येथील राजशेखर मंगल कार्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये देशभक्तीपर वैयक्तिक व समूहगीत,  वेशभूषा आदी  कलेचे सादरीकरण होणार आहे. या सर्व कार्यक्रमास सर्वांनी जास्तीतजास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन तहसीलदार राजाभाऊ कदम यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

नांदेड जिल्हा पोलिस दलाच्या वतीने मिशन उडान या अभियाना अंतर्गत आज सुशिक्षित बेरोजगाराना उमेदवाराना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने भव्य रो...