Tuesday, November 12, 2024

वृत्त क्र. 1075

दुसऱ्याच्या प्रचाराचे गाणे वापरणाऱ्या उमेदवारावर गुन्हा दाखल 

नांदेड, दि. 12 नोव्हेंबर :- विधानसभा निवडणुकीमध्ये लोहा मतदारसंघात एका उमेदवाराने दुसऱ्या उमेदवाराचे गाणे वापरल्यासंदर्भात लोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रचार साहित्यासाठी माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीची (एमसीएमसी) परवानगी आवश्यक आहे. मात्र ही परवानगी तर घेतलीच नाही उलट नामसाधर्म्य असलेल्या उमेदवारांचे गाणे वापरले तसेच प्रचारात लोकांची दिशाभूल केली. त्यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आशाबाई श्यामसुंदर शिंदे यांचे उमेदवार प्रतिनिधी प्रमोद एकनाथ शिंदे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी 88-लोहा यांना यासंदर्भात तक्रार दिली आहे. लोहा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाच्या आशाबाई श्यामसुंदर शिंदे  निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्याच नावाशी साधर्म्य असणाऱ्या अन्य अपक्ष महिला उमेदवार आशाताई श्यामसुंदर शिंदे यांनी शेकापच्या आशाबाई यांच्या प्रचार गीताची कॉपी केली असल्याची तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीमध्ये श्यामसुंदर शिंदे यांनी अपक्ष महिला उमेदवार आशाताई श्यामसुंदर शिंदे हे प्रचार गीत आणि आमचे नेते कै. भाई केशवराव धोंडगे, गुरुनाथ कुरुडे यांचे छायाचित्र प्रचारात वापरत असून गाडी क्र. एमएच 26 एडी 9286 महिंद्रा बोलेरो व अन्य गाड्यांद्वारे अपप्रचार करीत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी लोहा यांनी माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीकडून अहवाल घेतला होता. अपक्ष उमेदवार आशाताई श्यामसुंदर शिंदे निशाणी ट्रक यांनी कक्षाकडून जाहिराती ईलेक्ट्रॉनिक माध्यमाकडून प्रसारित करण्यास परवानगी घेतली नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे प्रचार गाणे विनापरवानगी वापरणे, नेत्यांचे चेहरे व व्हिडीओ प्रचारासाठी वापरणे व त्याद्वारे मतदारांची दिशाभूल करणे यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 171, कलम 174 व कलम 223 अंतर्गत अज्ञात वाहनचालकाच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

00000

No comments:

Post a Comment

    वृत्त क्र. 68 नांदेड जिल्ह्यातील 67 रेती घाटांची जिल्हाधिकाऱ्यांच्या समक्ष पर्यावरणीय जन सुनावणी  स्थानिक रोजगाराला प्राधान्य देण्याचा स...