Tuesday, November 12, 2024

वृत्त क्र. 1073

विनापरवानगी बल्क व्हाईस मेसेज टाकणाऱ्या तीन उमेदवारांना नोटीस

नांदेड, दि. 12 नोव्हेंबर :- निवडणूक काळामध्ये उमेदवारांनी प्रचार साहित्याची पुर्वपरवानगी घेणे निवडणूक आयोगाने बंधनकारक केले आहे. व्हिडीओ, ऑडिओ, बल्क मेसेज, ऑडिओ मेसेज, प्रचाराची रिल, छोटे व्हिडीओ याची परवानगी माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समिती (एमसीएमसी) कक्षाकडून घ्यावी लागते. मात्र अशा पध्दतीची परवानगी न घेणाऱ्या तीन उमेदवारांना नांदेड उत्तर चे निवडणूक निर्णय अधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे यांनी नोटीस बजावली आहे. 

माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समिती जिल्ह्यामध्ये स्थापन झाली आहे. प्रसारमाध्यमाचा वापर करताना उमेदवारांनी निवडणूक आयोगाचे निर्देश पाळणे आवश्यक आहे. यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार एमसीएमसीची परवानगी आवश्यक आहे. मात्र बल्क व्हाईस मेसेज पाठविणारे निवडणुकीतील उमेदवार श्रीमती संगीता विठ्ठल पाटील, देशमुख मिलींद उत्तमराव, बालाजी देविदास कल्याणकर यांनी परवानगी न घेताच बल्क मेसेज प्रसारित केल्याचे निर्देशास आले आहे. 

यासंदर्भात जिल्हा माहिती अधिकारी तथा सदस्य सचिव माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समिती, नांदेड यांनी याबाबतीत निवडणूक निर्णय अधिकारी 86-नांदेड उत्तर यांनी अवगत केले. त्यामुळे दि. 12 नोव्हेंबर रोजी या संदर्भातील नोटीस बजावण्यात आली आहे. एमसीएमसी कक्षाची परवानगी न घेता प्रसारित केलेल्या बल्क एसएमएस संदेशासाठी 24 तासाच्या आत खुलासा करण्याचे निर्देशित करण्यात आले आहे. 

यासंदर्भात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी उमेदवारांनी मुक्त वातावरणात प्रचार प्रसार करावा, मात्र नियमाचा भंग होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. ईलेक्ट्रानिक्स फॉरमॅटमधील सर्व ऑडिओ, व्हिडीओ साहित्याला परवानगी आवश्यक आहे. तसेच बल्क एसएमएस, व्हाईस एसएमएस प्रसारित करणाऱ्या कंपन्यानी उमेदवारांकडून परवानगी असल्याशिवाय प्रसारण करु नये, असेही स्पष्ट केले आहे. मुद्रित माध्यमाच्या जाहिरातींसाठी मात्र शेवटच्या दोन दिवसात परवानगी घ्यावी लागेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...