Tuesday, November 12, 2024

 वृत्त क्र. 1068

नांदेड दक्षिण विधानसभा निवडणुकीसाठी मतदान 

अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण  संपन्न

११०० प्रशिक्षणार्थ्यानी घेतले प्रशिक्षण

नांदेड, १२ नोव्हेंबर:-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेतील शिस्तबद्धता आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण नागार्जुना पब्लिक स्कुल,कौठा, नांदेड येथे आज 12 नोव्हेंबर रोजी  यशस्वीरित्या संपन्न झाले. 

आजच्या प्रशिक्षणामध्ये जवळपास 1100 कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या प्रशिक्षणात मतदान प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण घटकांवर तसेच ईव्हीएम मशीन (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) व वीव्हीपॅटच्या (VVPAT) वापरावर विशेष प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी डॉ खल्लाळ यांनी प्रथम क्षेत्रिय अधिकारी यांना सूचना देवून मार्गदर्शन केले. 

त्यानंतर मतदान अधिकारी व कर्मचारी यांना निवडणूक प्रक्रियेतील संपूर्ण माहिती देणाऱ्या लोकविधान पोर्टलचे महत्त्व विशद करुन या पोर्टलचा वापर करण्याचे आवाहन केले. प्रशिक्षण स्थळी जागोजागी या पोर्टलचा वापर करण्यासाठी बारकोड लावण्यात आले होते. यावेळी प्रशिक्षणपीठावर मनपा उपायुक्त सुप्रिया टवलारे, सहायक आयुक्त मनिषा नरसाळे, तहसिलदार प्रविण पांडे,नायब तहसीलदार नितेशकुमार बोलोलु, संजय नागमवाड यांची उपस्थिती होती.

मुख्य प्रशिक्षक संघरत्न सोनसळे यांनी प्रशिक्षण देतांना मतदान प्रक्रियेतील जबाबदाऱ्या, पारदर्शकता, मतदारांची ओळख तपासणी, गुप्त मतदान प्रक्रिया, मतपेटी हाताळणी, तसेच ईव्हीएम मशीनच्या वापराबाबत  ईव्हीएम आणि वीव्हीपॅटची कार्यप्रणाली स्पष्ट करून कर्मचाऱ्यांना मशीनच्या सुसज्जतेबाबत दक्ष राहण्याचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी मतदान केंद्रांवरील शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक तंत्रांचा वापर कसा करावा ,याचेही मार्गदर्शन केले.मतदानाच्या प्रक्रियेत काटेकोर पालन करणे कसे महत्त्वाचे आहे यावर त्यानी भर दिला. ईव्हीएम मशीनची सुरक्षित हाताळणी, मशीन प्रमाणपत्र तपासणे, मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मतपेट्यांचे सुरक्षित हस्तांतरण यासारख्या विषयांवर त्यांनी प्रशिक्षण दिले.  तसेच मतदान केंद्रांवरील सुरक्षा व्यवस्थापनाचे महत्त्व अधोरेखित केले.

 मतपेटी आणि ईव्हीएमची सुरक्षित हाताळणी, मतमोजणी प्रक्रिया आणि मतदानाच्या वेळी शक्य असलेल्या तांत्रिक अडचणींवर मार्गदर्शन केले. ईव्हीएम आणि वीव्हीपॅट वापराचे तंत्र आणि त्यातील तांत्रिक बाबींसाठी कर्मचार्‍यांना विशेष निर्देश दिले, ज्यामुळे मतदानाच्या प्रक्रियेत सुलभता निर्माण होईल. यावेळी काही मतदान अधिकारी व कर्मचारी यांनी आपले प्रश्न उपस्थित केल्यामुळे प्रत्यक्ष मतदान केंद्रावर कोणत्या समस्या निर्माण होतात आणि उपाय कोणते, हे सर्वांना समजले. प्रशिक्षण दरम्यान उपस्थित कर्मचाऱ्यांनी मतदान प्रक्रियेत येणाऱ्या संभाव्य अडचणींबाबत प्रश्न विचारले आणि त्यांना तज्ञांकडून समाधानकारक उत्तरे देण्यात आली.

या प्रशिक्षणमुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला असून, ते आता आगामी निवडणुकीसाठी अधिक सज्ज झाले आहेत. यानंतर  एकूण  15 विविध कक्षामध्ये प्रत्येकी 40 जणांस तंत्रज्ञानाचा अचूक वापर करुन प्रत्यक्ष कृतीतून प्रशिक्षण देण्यात आले.  प्रशिक्षण कंटाळवाणे  होवू नये प्रशिक्षणार्थांनी सुध्दा सक्रीय सहभाग घेऊन या आधुनिक तंत्राचा वापर करण्यासाठी पुढाकार घेतला.ही प्रक्रिया राबविण्यासाठी शाळेचे संचालक केशव गड्डम यांनी आपल्या संपूर्ण तंत्रज्ञ टिमसह तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यासाठी भरीव सहकार्य केले आहे. तंत्रज्ञ म्हणून सुशील माळवतकर, मोईन खान यांनी कार्य केले. प्रत्यक्ष मतदान यंत्र कसे हाताळावे याचे प्रात्यक्षिक मास्टर ट्रेनर मोहन कलंबरकर, धर्मेंद्रसिंग शिलेदार, सचिन राका, गजानन मस्के यांनी दाखवले.या प्रशिक्षणाचे सुत्रसंचालन व आभार संजय विश्वनाथ भालके यांनी केले. हे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी पेशकार राजकुमार कोटुरवार,नियोजन सहाय्यक बी.एस.पांडे,मकरंद भालेराव, राजेश कुलकर्णी, एस.व्ही.भालके प्रा. डॉ.घनश्याम येळने,डॉ सचिन नरंगले, बालासाहेब कच्छवे, हनुमंत राठोड,जमील शेखसह सर्व नांदेड तहसील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

०००००
























No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...