लोककलांच्या माध्यमातून विविध विकास योजनांचा जिल्ह्यात जागर
नांदेड (जिमाका) दि. 9 :- जनसामान्याच्या विकासासाठी विविध लोकाभिमूख योजना शासनाने हाती घेतल्या आहेत. या योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने लोककला पथकांच्या माध्यमातून ग्रामीण भागात शासनाच्या विविध योजनांची माहिती पोहचवली जात आहे.
राज्यातील महाविकास आघाडी शासनाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने कोरोनाचे आव्हान समर्थपणे पेलून अनेक नवीन महत्त्वपूर्ण योजना हाती घेतल्या आहेत. ज्यांच्यासाठी या योजना आहेत त्या लोकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचाव्यात यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने ही विशेष प्रसिद्धी मोहीम राबविली जात आहे. या अनुषंगाने नांदेड जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने जिल्ह्यातील 16 तालुक्यात आजपासून महाविकास आघाडी शासनाच्या योजनांचा जागर करण्यात येणार आहे. यासाठी शासनाच्या यादीवरील लोककलापथकांतील गुणवत्तानुक्रमाणे 5 संस्थाची निवड करण्यात आली आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने या पारंपारिक माध्यमातून लोककलांचा जागर करण्यात येणार आहे. शासकीय योजनांचा जागर करण्यासाठी शासन निर्णयात नमूद जिल्ह्यातील राम मनोहर लोहिया प्रतिष्ठान विकास महामंडळ दगडगाव, ता. लोहा, सजामाता बहुउद्देशिय सांस्कृतिक कला प्रतिष्ठान गवळेवाडी, पो. दापका (गु) ता. मुखेड, शिवशक्ती कलामंच, शिवनेरीनगर विमानतळ परिसर नांदेड, जनजागृती बहुउद्देशिय सेवाभावी संस्था डोंगरगाव ता. मुदखेड, कै. सोपानराव तादलापूरकर क्रीडा मंडळ व व्यायामशाळा कुंचेली ता. नायगाव या संस्थाच्यावतीने कार्यक्रम सुरू आहेत.
“दोन वर्षे जनसेवेची महाविकास आघाडीची” या घोषवाक्यासह आजपासून जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात बाजाराच्या ठिकाणी, आठवडी बाजार या गर्दीच्या ठिकाणी हे कलापथक शासनाच्या योजनांवर आधारीत एकूण 59 कार्यक्रम सादर करणार आहेत.
यापैकी आज जनजागृती बहुउद्देशिय सेवाभावी संस्था डोंगरगाव यांच्यामार्फत हिमायतनगर येथील गणपती मंदिरासमोर कार्यक्रम सादर करण्यात आला. शिवशक्ती कला मंच शिवनेरीनगर या कलापथकामार्फत अर्धापूर बसस्टॅडच्यासमोर खंडोबा मंदिराजवळ कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष छत्रपती कानोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक पंडीतराव लंगडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच अर्धापूर तालुक्यातील देळूब येथे दुसरा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन देळूबचे सरपंच अजेर पठाण यांनी केले तर उपसरंपच अनिल थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. कै. सोपानराव तादलापूरकर क्रीडा मंडळ व व्यायामशाळा कुंचेली यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा कोर्टाच्या बाजूला देगलूर येथे कार्यक्रम सादर केला आहे. यावेळी तडखेलचे पोलीस पाटील, पत्रकार सोनकांबळे व जेष्ठ नागरिक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांपर्यंत विकास योजनांची माहिती या मोहिमेद्वारे प्रभावीपणे पोहोचेल, असा विश्वास जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी व्यक्त केला आहे.
00000
No comments:
Post a Comment