Wednesday, October 26, 2016

तीन दिवस दिवाळी पहाट महोत्सव 2016
बंदाघाट येथे होणार - जिल्हाधिकारी सुरेश काकाणी
 नांदेड दि. 26 :- शहरात शनिवार 29, रविवार 30, सोमवार 31 आक्टोंबर 2016 रोजी दररोज सकाळी 5.30 ते 8.30 वाजेपर्यंत तीन दिवस दिवाळी पहाट महोत्सव-2016 बंदाघाट येथे जिल्हा प्रशासन, महापालिका आणि सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने सादर होणार आहे , अशी माहिती जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी दिली आहे.
शनिवार 29 ऑक्टोंबर रोजी सकाळी 5.30 वा. पं. कुमार गंधर्व यांचे नातू व प्रख्यात गायक भुवनेश कोमकळी (देवास म.प्र.) आणि श्रीमती हेमा उपासनी (मुंबई) यांचा निर्गुणी भजन, सुफी, मराठी गझल, संत मीराबाई व संत कबिराच्या रचनांवर कार्यक्रम सादर होणार आहे. या कार्यक्रमाचे निवेदन गोविंद पुराणीक हे करणार आहेत. याच दिवशी सकाळी 8.30 वा. कविता शिरपूरकर (संपर्क क्र.9420668508) या मुली आणि महिलांकरीता रांगोळी स्पर्धा घेणार आहेत.
रविवार 30 ऑक्टोबर 2016 सकाळी 5.30 वा. स्वयंवर प्रतिष्ठान ``रंग अभिषेकी`` प्रख्यात गायक आणि संगीत दिग्दर्शक पं.जितेंद्र अभिषेकी रचित बंदीश, ठुमरी, नाटयपद, अभंग मुंबईच्या प्रख्यात गायक डॉ. राजा काळे यांची कन्या सुप्रसिद्ध गायिका अमृता काळे व पं.अजय चक्रवर्ती यांचे शिष्य अभिजीत अपस्तंब हे दोघे सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन प्रा. सुनील नेरलकर करणार आहेत.
सोमवार 31 आक्टोंबर सकाळी 5.30 वा. गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडीट को-ऑप.सोसायटी लि.नांदेड यांच्यावतीने  पत्रकार विजय जोशी निर्मित व संगीतकार प्रमोद देशपांडे यांच्या संगीत संयोजनाखाली प्रभाती सुर नभी रंगती हा स्थानिक कलावंताचा भक्ती गीत व भाव गितांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ॲड. गजानन पिंपरखेडे हे करणार आहेत. यात कु. वर्धिनी जोशी, शर्वरी हिरवे, तेजश्री देशपांडे, कल्याणी जोशी, समिक्षा चंद्रमोरे व इतर गुणी कलावंत सहभागी होणार आहेत.
व्यासपीठ, बैठक व्यवस्था, ध्वनीक्षेपण व्यवस्था, महानगरपालिका व गुरुद्वारा बोर्ड करणार असून रोज सकाळी `दिवाळी नाष्टा` लंगर साहिब गुरुद्वारा करणार आहे. यासोबत इन्टॅच तर्फे नांदेडचा सांस्कृतिक वारसा दर्शवणारे फोटो प्रदर्शन व माँ गोदावरी श्रमसेवा परिवाराच्या कार्याचे चित्र प्रदर्शन आयोजित केले आहे.
प्रत्यक्ष बंदाघाट येथे कार्यक्रमास हजर राहून दिवाळीच्या शुभेच्छा एकमेकांना देवून दिवाळी उत्सव साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी केले आहे.
जिल्हा प्रशासनामधील सर्व संस्था कार्यक्रमाचे आयोजन करीत असल्या तरी अनेक सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत जिल्हा प्रशासनाच्यावतीने मनपा आयुक्त समीर उन्हाळे यांचे मार्गदर्शनाखाली उपायुक्त रत्नाकर वाघमारे संयोजक म्हणून काम पाहणार आहेत.

---000---

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...