Friday, June 9, 2017

"उन्नत शेती-समृद्ध शेतकरी" उपक्रमासह विविध कामांना
जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. मोटे यांनी दिल्या भेटी
नांदेड दि. 9 :- भोकर तालुक्यातील विविध गावांना जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी भेटी देवून कृषि विभागामार्फत सुरु असलेल्या कामांची पाहणी केली व समाधान व्यक्त केले.  
रोहीणी नक्षत्राचा मुहूर्तावर "उन्नत शेती-समृद्ध शेतकरी" अभियानाद्वारे दिवशी बु येथे आयोजित शेतकरी प्रशिक्षणास मार्गदर्शन करताना शेतकऱ्यांशी संवाद साधून कृषि विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती, खरीप हंगामातील प्रमुख पिकांच्या पीक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. मौजे दिवशी येथील सोयाबीन पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी माती परिक्षणासह नवीन जातीची लागवड, बीज प्रक्रिया, योग्य खत व्यवस्थापन, एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन, दोन ओळी व रोपातील योग्य अंतरासह बीबीएफ यंत्राद्वारे लागवड करण्याबाबत तसेच सोयाबीनमध्ये तुरीचे आंतरपीक 4 :2 या प्रमाणात लागवड करण्याबाबत मार्गदर्शन केले.  
डॉ. मोटे पुढे म्हणाले की, तालुक्यात खरीप हंगामात लागवड होत असलेल्या पिकांबाबत तसेच उत्पादीत शेतमालाच्या बाजारातील दरांबाबत माहिती देतांना जागतीक उत्पादकता व त्याचा दरावर होणारा परिणाम याबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधून सविस्तर चर्चा केली. तसेच यातून मार्ग काढण्यासाठी येत्या खरीप हंगामात लागवड करताना एकाच पिकाकडे न वळता कापूस, सोयाबीन, तुर, मुग, उडीद, ज्वारी इत्यादी विविध पिकांची लागवड करावी. जेणेकरुन उत्पादीत शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळतील. त्यामुळे एकाच पिकाची लागवड न करता विविध खरीप पिकांची लागवड करण्याबाबत आवाहन करुन जलयुक्त शिवार अभियानांतर्गत प्रस्तावीत कामे सर्व यंत्रणानी वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.  
"उन्नत शेती-समृद्ध शेतकरी" अभियानांतर्गत भोकर तालुक्यातील दिवशी गावातील कृषि वार्ताफलकाचे फीत कापून उद्घाटन डॉ. मोटे यांच्या हस्ते करण्यात आले.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामांची तसेच मागेल त्याला शेततळे कामांची पाहणी केली. मातुळ व बल्लाळ गावातील दाळीचे बांध, मागेल त्याला शेततळे, तसेच पिंपळढव, लामकणी, कुमणगाव, धारजणी, डौर, सायाळ येथील दाळीचे बांध तर सावरगाव गेट येथील वनविभागामार्फत  केलेल्या खोल सलग समतल चराची पाहणी केली. पोमनाळा येथील शेततळे कामाची पाहणी करुन कामाबद्दल समाधान व्यक्त केले.
धारजणी येथे ठिबकवरील कापूस, तुर पिकाच्या लागवडीची तर भोकर येथील केळी पिकाची पाहणी करुन तुरीच्या विरळणीबाबत मार्गदर्शन केले. भोकर तालुक्यातील विविध गावांना भेटी देवून शेतकऱ्यांशी संवाद साधला. कृषि विभागामार्फत चालू असलेल्या कामांची पाहणी केली.
तालुका कृषि अधिकारी आर. एम. देशमुख, मंडळ कृषि अधिकारी सदाशीव पाटील, कृषि पर्यवेक्षक सुनील चव्हाण, बी. डी. पुरी, रहिम यांच्यासह कृषि सहाय्यक सौ. कुलमुले, श्री. बल्लुरकर, लोसरवार, शिंदे, व्ही. डी. पाटील, वसमते, पवार, बारसे यांच्यासह तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक बोईनवाड उपस्थित होते.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...