Friday, September 17, 2021

 मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध रस्ते विकासासह

हैद्राबाद-नांदेड ग्रीन फिल्ड मार्गासाठी प्रयत्नशील

-         सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण 

नांदेड, जिमाका, दि. 17 :-मराठवाड्याच्या सर्वागिण विकासाचा मार्ग हा मुंबई, पुणेसह जवळ असलेल्या हैद्राबाद महानगराच्या रस्ते विकासातून अधिक समृध्द होणार आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे स्वत: मराठवाडा विकासासाठी दक्ष असून या भागातील विकासाच्या प्रकल्पांना त्यांनी प्राधान्य दिलेले आहे. नांदेड-जालना समृध्दी महामार्गाला त्यांनी तात्काळ मंजुरी देवून ही कटिबध्दता अधिक दृढ केली असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. नांदेड महानगरपालिकेच्यावतीने आयोजित शहरातील महात्मा फुले मार्केट पुनर्विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. 

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, महापौर सौ. मोहिनी येवनकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने व इतर मान्यवर उपस्थित होते. 

स्वयंरोजगाराच्या संधी वाढण्यासाठी मोठी महानगरे अधिक सुलभ पध्दतीने, समृध्दी महामार्गाने जोडल्या गेली तर त्या-त्या ठिकाणी विकासालाही गती मिळेल. यादृष्टीने विचार करुन मुंबई-नागपूर समृध्दी महामार्गाशी नांदेड जोडता यावे या उद्देशाने आपण नांदेड-जालना या समृध्दी महामार्गाच्या कामाला गती दिली आहे. मुंबई-पुणे-औरंगाबाद-जालना-नांदेड पाठोपाठ आता नांदेड ते हैद्राबाद या नवीन ग्रीन फिल्ड मार्गासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांच्याशी भेटून लवकरच मार्ग काढू, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. 

लोकसंख्येच्या वाढत्या गरजेनुसार विविध सेवा व सुविधा महानगरपालिके अंतर्गत उपलब्ध करुन देताना त्यातील गुणवत्ता व सातत्य जपणे हे अधिक महत्वाचे आहे. याचबरोबर ज्या सुविधा पुरविल्या जात आहेत त्यांचा विकास करण्यासाठी महानगरपालिकेसारख्या स्वायत्त संस्थाना उत्पनाची साधने वाढविण्याशिवाय गत्यंतर नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नांदेड येथील महात्मा फुले मार्केट पुनर्विकास योजनेतून जुन्या भाडेकरुना सामावून घेत याठिकाणी निर्माण होणारे नवीन व्यापारी संकुल हे नांदेडच्या वैभवाचे प्रतिक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

सुमारे पन्नास हजार चौ.फूट जागेचे हे बांधकाम एका वर्षात पूर्ण करण्याचा संकल्प आहे. लोकांनी याला चांगले सहकार्य केले तर हा प्रकल्प वेळेत पूर्ण होईल. विकासाच्या प्रक्रीयेत नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे. याचबरोबर मनपाचीही तेवढीची जबाबदारी आहे. चांगल्या सुविधा नागरिकांपर्यत पोहचविण्यात जर कुणाचा अडथळा येत असेल, तर अशा व्यक्तीविरुध्द कठोर कारवाई करुन सुविधा व कामाच्या दर्जेला प्राधान्य देण्याच्या सूचना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मनपाला केल्या. यावेळी मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी सदर व्यापारी संकुलाची माहिती दिली. मान्यवराचे स्वागत केले.

0000






No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...