Friday, September 17, 2021

 मराठवाडा मुक्ती संग्रामातील व्यक्तीचित्रे प्रदर्शनाचा

पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे हस्ते शुभारंभ 

·         जिल्ह्यातील 75 शाळांमध्ये मुक्ती संग्रामाचा इतिहास पोहचविण्यावर भर

·         जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाच्या स्वच्छता रथाचा शुभारंभ 

नांदेड (जिमाका), दि. 17 :- मराठवाडा मुक्ती संग्रामात हौतात्म्य पत्करलेल्या आणि भरीव योगदान दिलेल्या स्वातंत्र्यसेनानीच्या कार्याची ओळख सामान्य जनतेला व शालेय विद्यार्थ्यांना व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने भर दिला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यातील 75 शाळांमध्ये मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसेनानी व हौतात्म्याच्या व्यक्तीचित्राचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचा शुभारंभ आज माता गुजरिजी विसावा उद्यानात ध्वजारोहन कार्यक्रमानंतर पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे हस्ते संपन्न झाला. 

यावेळी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वच्छता रथाचा शुभारंभ पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. 

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, महापौर सौ. मोहिनी येवनकर, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजय बेळगे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने व विविध विभागाचे अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने 17 सप्टेंबर या दिवसांचे औचित्य साधून स्वातंत्र्य सेनानीच्या कार्याची व चळवळीची ओळख सर्व जनता व शालेय विद्यार्थ्यांना होण्यासाठी या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येणार आहे. या प्रदर्शनासाठी डॉ. मंगला बोरकर यांच्या मराठवाडा मुक्ती संग्रामातील व्यक्तीचित्रे या पुस्तकाच्या आधारे स्वातंत्र्यसेनानी व हौत्यात्म्याची माहितीवर आधारित 75 शाळांमध्ये प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. तसेच गाव पातळीवर जनजागृती करण्यासाठी डिजिटल मोबाईलच्या मदतीने हे प्रदर्शन गावातील बाजार व प्रमुख चौकात दाखविण्यात येणार आहे.

00000



No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...