Friday, September 17, 2021

 नांदेड जिल्हा रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनाचा शासन निर्णय निर्गमित;

१०० खाटांऐवजी ३०० खाटांच्या रुग्णालयास मान्यता

पालकमंत्री अशोक चव्हाणांनी मानले मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांचे आभार

 

            मुंबईदि. १७-  नांदेडच्या जिल्हा रुग्णालयाचे १०० खाटांवरुन ३०० खाटांत श्रेणीवर्धन करण्यास सार्वजनिक आरोग्य विभागाने मान्यता दिली असूनयाबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या रुग्णालयात खाटांची संख्या वाढल्याने जिल्ह्यातील रुग्णांना याचा मोठा लाभ होणार आहे. रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता.

            नांदेड शहरासह जिल्ह्याची वाढती लोकसंख्या पाहता जिल्हा रुग्णालयातील १०० खाटा अपुऱ्या पडत होत्या. कोविड विषाणू प्रादुर्भावाच्या काळात या रुग्णालयातील खाटांची संख्या वाढविण्याची गरज प्रकर्षाने जाणवली. दरम्यानया जिल्हा रुग्णालयातील खाटांची संख्या वाढविण्याची मागणी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली होती. त्यानुसार नांदेडच्या जिल्हा रुग्णालयाची क्षमता १०० खाटांवरुन ३०० खाटा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

            ३०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाची नवीन अत्याधुनिक इमारत सध्याच्याच जागेत बांधली जाणार असूनवाढीव आवश्यकतेनुसार पदनिर्मितीही केली जाणार आहे. या रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनामुळे जिल्ह्यातील गरजूंना वैद्यकीय उपचाराच्या दर्जेदार आणि वाढीव सुविधा उपलब्ध होतील. मराठवाडा मुक्तिसंग्रामच्या ७४ व्या वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हा रुग्णालयाचे ३०० खाटांमध्ये श्रेणीवर्धन करण्याचा शासन निर्णय निर्गमित होणे ही नांदेडकरांसाठी मोठी भेट असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. या निर्णयासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आभार मानले आहेत.

००००

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...