Monday, October 22, 2018


रब्बी हंगाम आपत्कालीन पिक
नियोजन आराखडा व्यवस्थापन
नांदेड दि. 22 :- खरीप 2018 हंगामामध्ये जुन ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीच्या 76 टक्के इतके पर्जन्यमान झाले आहे. त्याचप्रमाणे परतीचा पाऊस देखील समाधानकारक न झाल्याने पुरेशा ओलाव्याअभावी रब्बी हंगामातील पिकांवर देखील याचा परिणाम होणार आहे.
त्यामुळे जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असल्याची खात्री करुनच पेरणी करण्यात यावी. यासंदर्भात केंद्र शासनाने जिल्हानिहाय आपत्कालीन पीक आराखडा ICAR या संस्थेने तयार केला असून केंद्र शासनाच्या www.crida.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
जिल्हास्तरावर स्थानिक परिस्थितीनुसार कृषि विद्यापीठ / कृषि संशोधन केंद्र व कृषि विज्ञान केंद्र यांच्या सल्ल्याने रब्बी हंगामातील पीक नियोजन आराखडा तयार करण्यात यावा. दुष्काळ सदृश्य परिस्थिती / दुष्काळात फलोत्पादन पिकांचे व्यवस्थापन करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.
रब्बी हंगामातील आपत्कालीन पीक नियोजनाचे अनुषंगाने पुढील प्रमाणे सर्वसाधारण सुचना देण्यात येत आहेत. जमिनीमध्ये पुरेसा ओलावा /  सिंचनाची सुविधा असल्याशिवाय पेरणी करण्यात येऊ नये. रब्बी हंगामात हरभरा, गहू, ज्वारी, मका, करडई, सूर्यफुल यासारखी पिके घेण्यात येतात. मध्यम व कमी कलावधीत पक्व होणाऱ्या जातींचा तसेच कमी पाण्यावर येणारी आणि कृषि विद्यापीठांनी ज्या भागांकरिता शिफारस केली आहे अशा पिकांचे नियोजन करण्यात यावे. जमिनीत ओलावा टिकविण्याकरिता आच्छादन पद्धतीचा अवलंब करावा. जमिनीतील ओलावा टिकविण्यासाठी पेरणी केलेल्या पीकामध्ये 21 दिवसानंतर कोळपणी करुन, पीकांना मातीची भर द्यावी. पिकामध्ये आंतरमशागतीची कामे वेळेत करण्यात यावीत. त्यामुळे तणांचा बंदोबस्त होऊन जमिनीचा ओलावा टिकून राहण्यास मदत होते. सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यास पिकाच्या वाढीच्या कालावधीत तुषार / ठिबक पद्धतीने पिकांना पाणी देऊन पाण्याचे व्यवस्थापन करण्यात यावे. फळबागामध्ये आच्छादनासाठी झाडाच्या बुंध्याभोवती वाळलेले गवत, धसकटे, पालापाचोळा इत्यादींचे आच्छादन करावे. फळबागांना पाण्याचा ताण पडू नये म्हणून केओलीन 8 टक्के किंवा पोटॅशियम नायट्रेट 1 ते 2 टक्के याप्रमाणात फवारणी करावी. फळबागेमध्ये 1 टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. तसेच खोडांना 10 टक्के बोर्डोपेस्ट लावावी. पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता असलेल्या भाजीपाल्यांचे वाण लागवडीकरिता निवड करावी. ज्या जिल्हृयात चारा टंचाई असेल अशावेळी सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यास प्राधान्याने चारा पिके घेण्यात यावी, असे पुणे कृषि आयुक्तालयाचे संचालक (विस्तार व प्रशिक्षण) यांनी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नांदेड यांच्यावतीने प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...