Monday, October 22, 2018


गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेत
  10 लाख 86 हजार मुला-मुलींचे लसीकरण 
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड दि. 22 :-  जिल्ह्यात गोवर-रुबेला लसीकरण मोहिम 27 नोव्हेंबर ते पुढील पाच आठवडे या कालावधीत राबविण्यात येणार असून या मोहिमेत नांदेड जिल्ह्यातील 9 ते 15 वर्षे वयोगटातील 10 लाख 86 हजार 744 मुला-मुलींचे लसीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली. 
गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेची जिल्हास्तरीय कार्यबल गटाची दुसरी बैठक जिल्हाधिकारी यांचे दालनात जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांचे अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. विद्या झिने, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एच. आर. गुंटूरकर, डॉ. सुरेशसिंग बिसेन, शिक्षणाधिकारी (प्रा.) प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी (मा.) अशोक देवकरे, कुंडगीर, डॉ. बद्दिओद्यीन, समाज कल्याण अधिकारी कुंभारगावे, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. अब्दुल वसे यांची प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले, राज्यात गोवर-रुबेला लसीकरण मोहिम येत्या नोव्हेंबर महिन्यात राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व शाळा व अंगणवाडीत मुला-मुलींचे लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य, शिक्षण, महिला व बालकल्याण, महानगरपालिका, खाजगी वैद्यकीय डॉक्टर, सामाजिक व सेवाभावी संस्था यांचा सहभाग राहणार आहे. सीबीएससी, खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे संस्था चालक व मुख्याध्यापकांची बैठक शिक्षणाधिकारी घ्यावी तसेच बालरोग तज्ज्ञांनी खाजगी दवाखाण्यात गोवर-रुबेला लसीकरणाचे माहितीपत्रक लावावेत, असे निर्देश श्री. डोंगरे यांनी दिले. 
ही मोहिम प्रभावीपणे राबविण्यासाठी आरोग्य विभागामार्फत सुक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. आयएपी व आयएमए बालरोग तज्ञांमार्फत मोहिमेसाठी आवश्यक ते सहकार्य करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. या मोहिमेत संबंधीत वयोगटातील मुला-मुलींना पूर्वीचे लसीकरण ग्राह्य न धरता गोवर-रुबेलाची लस प्रशिक्षीत व्यक्तमार्फत दिली जाणार आहे. या मोहिमेसाठी लागणाऱ्या लसीची मागणी (शहरी व ग्रामीण) ची नोंदविण्यात आली आहे. या मोहिमेत शालेय विद्यार्थ्यांची संख्या 6 लाख 55 हजार 619 (शहरी, ग्रामीण, मनपा) असून तर शालेय बाहेर लाभार्थ्यांची संख्या 4 लाख 31 हजार 125 एवढी आहे. एकुण लाभार्थ्यांची संख्या 10 लाख 86 हजार 744 आहे. या मोहिमेतील आयोजित आरोग्य सत्राची संख्या 7 हजार 987 द्वारे प्रशिक्षीत आरोग्य कर्मचाऱ्यांकडून लसीकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शाळा व पालकांचा या मोहिमेत संपूर्ण सहभाग घेण्यात येत असून शालेयस्तरावर  शिक्षक व पालक तसेच शिक्षक व विद्यार्थी संवाद मेळावा आयोजित करण्यात येत आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...