Sunday, October 21, 2018


राज्य शासन नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी
- पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर
·         बिलोली, देगलूर येथे टंचाई सदृश्य परिस्थितीचा आढावा
·         शेतकऱ्यांशी मंत्री जानकर यांनी साधला संवाद

नांदेड दि. 21 :- उत्पन्न वाढीसाठी शेतीसह जोड व्यवसाय केल्यास शेतकऱ्यांसह तरुणांना रोजगार मिळण्यास मदत होईल. यासाठी राज्य शासन नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी असेल, असे प्रतिपादन राज्याचे   पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी केले.
देगलूर व बिलोली तालुक्यातील दुष्काळ परिस्थितीचा आढावा श्री. जानकर यांचे अध्यक्षतेखाली तेथील पंचायत समिती कार्यालयात घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.  
बैठकीस आमदार सुभाष साबणे, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य समिती सभापती माधव मिसाळे, जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण ठक्करवाड, डॉ. मिनल पाटील-खतगावकर, दशरथ लोहबंदे, माणिक लोहगावे, पंचायत समिती उपसभापती दत्ताराम बोधने, पंचायत समिती सदस्य शिवाजी देशमुख, बिलोली तहसीलदार विक्रम राजपूत, देगलूर तहसीलदार अरविंद बोळंगे, तालुका कृषि अधिकारी विजय घुगे, शिवाजी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. जानकर म्हणाले,  जलयुक्त शिवारची होत असलेली कामे दर्जेदार असली पाहिजेत. जेणेकरुन या अभियानातील कामांमुळे जमिनीतील पाणी पातळी वाढण्यास मदत होईल. वृक्ष लागवडीखालील क्षेत्र वाढविण्यासाठी शासन प्रयत्न करीत असून या मोहिमेत सर्वांचा सहभाग महत्वाचा आहे. शेतकरी व नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांनी ग्रामस्तरावर भेटी घेऊन त्या सोडवाव्यात, असे निर्देशही त्यांनी बैठकीत दिले.   
श्री. जानकर यांनी बिलोली तालुक्यातील बामणी बु, मिनकी, अटकाळी तर देगलूर तालुक्यातील बल्लूर, गवंडगाव, माळेगाव, मरतोळी, हणेगाव, शिळवणी आदि गावांना भेटी देऊन शेतीतील पिकांच्या नुकसानीची पाहणी करुन शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी शेतकरी, ग्रामस्थ, सरपंच, कृषि विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.     
या बैठकीत बिलोली व देगलूर तालुक्यातील पाणंद रस्ते, वृक्ष लागवड, विंधन विहीरीचा निधी, जनावरांचा चारा, विद्युत, पाणी प्रश्न, शेत रस्ते, बंधारे दुरुस्ती, मालगुजारी तलाव तसेच रिक्त पदांचा आढावा सादरीकरणाद्वारे घेण्यात आला. बैठकीस संबंधित विभागाचे अधिकारी, गावातील सरपंच, ग्रामस्थांची उपस्थिती होती.
00000000



वृत्त क्र. 909

बिलोली-मुंबई ; देगलूर-मुंबई शिवशाही बसला
  दुग्धव्यवसाय मंत्री जानकर यांनी दाखविली हिरवी झेंडी

नांदेड दि. 21 :- बिलोली-मुंबई व देगलूर-मुंबई या दोन महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसचा शुभारंभ राज्याचे   पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय मंत्री श्री जानकर यांनी हिरवी झेंडी दाखवून बिलोली व देगलूर येथील बसस्थानकात केला.
यावेळी आमदार सुभाष साबणे, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य समिती सभापती माधव मिसाळे, जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण ठक्करवाड, डॉ. मिनल पाटील-खतगावकर, दशरथ लोहबंदे, माणिक लोहगावे, पंचायत समिती उपसभापती दत्ताराम बोधने, पंचायत समिती सदस्य शिवाजी देशमुख, बिलोली तहसीलदार विक्रम राजपूत, देगलूर तहसीलदार अरविंद बोळंगे, विभाग नियंत्रक अविनाश कचरे,चालक व वाहक उपस्थित होते. याप्रसंगी श्री. जानकर यांचे हस्ते चालक-वाहकांचा सत्कार करण्यात आला.
000000


No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...