Saturday, January 25, 2025

वृत्त क्र. 100

पात्र नवमतदारांनी उत्साहाने मतदार यादीत नावे नोंदवावी 

कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांचे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आवाहन


नांदेड, दि. २५ जानेवारी :- ज्या तरुण-तरुणींनी 1 जानेवारी 2025 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण केली आहेत त्यांनी अत्यंत उत्साहाने आपली नावे मतदार यादीत नोंदवावी. तसेच आपल्या मित्रांना सुध्दा मतदार यादीत नावे नोंदविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन  स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी केले.

स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त कुलगुरू डॉ. मनोहर चासकर बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजकुमार माने,उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसिलदार संजय वरकड, निवडणूक नायब तहसिलदार नितेशकुमार बोलोलू, नायब तहसीलदार इंद्रनील गरड यांच्यासह जिल्ह्यातील बीएलओची उपस्थिती होती.

कुलगुरु डॉ. मनोहर चासकर म्हणाले की, सशक्त लोकशाही ही मतदार व मतदान या दोन बाबींवरच अवलंबून असते. तसेच मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे हक्क आहे. मतदार होऊन मतदान करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी प्रथमच मतदार यादीत ज्यांची नावे समाविष्ट झाली आहेत असे नवमतदार कु.सुरभी नितेशकुमार बोलोलू, कु.रिया खडके, दिव्यांग मतदार शिवराज गणेशराव गिरडे, सौरभ गिरडे, पवन गिरडे यांना कुलगुरू डॉ चासकर यांनी निवडणूक कार्ड देऊन सन्मान करण्यात आला.

डॉ सचिन खल्लाळ यांनी राष्ट्रीय मतदार दिन साजरा करायचा यामागचा उद्देश म्हणजे नवमतदार वाढले पाहिजेत अशा शब्दात त्यांनी राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यामागची पार्श्वभूमी सांगितली. राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्ह्यातील बि.एल.ओ., पर्यवेक्षक, ग्राम महसूल अधिकारी, समन्वयक व अंगणवाडी ताईंचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश कुलकर्णी यांनी केले तर आभार तहसीलदार संजय वरकड यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एस.व्हि.भालके, जमील,  मकरंद भालेराव, बी.एस.पांडे, श्री. घडलिंगे, श्री. भुसेवार, मोहम्मद आखीब , शेख अजहर यांनी विशेष परिश्रम घेतले.

प्रारंभी कुलगुरू डॉ चासकर यांनी मतदाराची पुढील प्रतिज्ञा दिली. “आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परपरांचे जतन करु आणि मुक्त नि:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करु.”

00000






No comments:

Post a Comment

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...