महत्वाचे वृत्त क्रमांक 394
महिन्याभरात शेत पांदण रस्त्यांचे अर्ज निकाली काढा
विभागीय आयुक्तांचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद
नांदेड दि. 16 एप्रिल : कुणी शेतावर, कुणी बांधावर, कुणी दुकानात तर कुणी दुपारच्या उन्हात झाडाखाली खाटेवर पहुडलेला. मात्र तरीही विभागीय आयुक्त आपल्याशी बोलतात या उत्सुकतेपोटी शेकडो शेतकऱ्यांनी आज 'संवाद मराठवाड्याशी ' या कार्यक्रमात विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्याशी संवाद साधला. यावेळी नांदेड जिल्ह्याने शेतरस्ते, शिव रस्ता, पांदण रस्ते व शेतीच्या रस्त्यासंदर्भात सुरू केलेल्या कार्यवाहीला महिन्याभरात पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. नांदेड जिल्ह्याने यासंदर्भात यापूर्वीच घेतलेल्या पुढाकाराचे कौतुकही केले.
छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी वेगवेगळ्या लाभांच्या व जिव्हाळ्यांच्या योजनासंदर्भात वेबिनारसत्र 'संवाद मराठवाड्याशी ' या उपक्रमांतर्गत सुरू केले आहे. विभागीय आयुक्त आपल्या मोबाईलवर थेट उपलब्ध होत असल्याने ग्रामीण भागात त्यांच्या या उपक्रमाला प्रतिसाद असून आज 8 जिल्ह्यातील शेकडो शेतकरी आपल्या प्रलंबित शेतमार्गांसाठी या वेबिनारमध्ये सहभागी झाले होते.
अर्जदार ,संबंधित तहसिलदार तसेच विभागीय आयुक्त एकाचवेळी उपस्थित असल्याने अनेक प्रश्न त्याक्षणी त्यांनी सोडवले गेले.याशिवाय या रस्त्यासंदर्भात अर्ज करतांना घ्यावयाची काळजी यासंदर्भातील कायदे व विशिष्ट कालमर्यादेत हे कार्य पूर्ण करण्याबाबत यंत्रणेला विभागीय आयुक्तांनी दिलेली ताकिद यामुळे शेतकऱ्यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.
नांदेड जिल्ह्यात तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनात शेती संदर्भातील सर्व रस्त्यांसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी देखील यासंदर्भात बैठक घेऊन पांदण रस्ते व अन्य रस्त्यांचे प्रश्न मुख्यमंत्री महोदयांच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमात पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील अन्य जिल्ह्याच्या तुलनेत नांदेडमध्ये यासंदर्भात मोठ्याप्रमाणात कामे सुरू आहेत. जिल्हा प्रशासनाकडे आलेल्या 1 हजार 129 अर्जांपैकी 420 रस्ते मोकळे झाले आहेत तर 709 रस्ते प्रलंबित आहेत. या अर्जांवर तातडीने कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही आज या बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी दिली.
आजच्या बैठकीला नांदेड येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपजिल्हाधिकारी पूनर्वसन संजीव मोरे, तहसिलदार विपीन पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी रस्त्यासंदर्भातील एक दिवसाचा सेमिनार आयोजित करण्यात येईल. पावसाळ्याच्या आत सर्व रस्त्यांचे आदेश काढले जातील. यासाठी आयुक्त कार्यालयाने सुचविल्याप्रमाणे सस्ती अदालत आयोजित करण्यात येईल, असे स्पष्ट केले. विभागीय आयुक्तांनी महिनाभरात नांदेड मधील सर्व प्रकरणे निकाली काढण्याचे आदेश यावेळी दिले.
00000
No comments:
Post a Comment