Tuesday, August 11, 2026

वृत्त क्रमांक

नांदेडमध्ये सीबीजी प्रकल्पांना चालना ; प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विभागांनी समन्वय ठेवावा - जिल्हाधिकारी कर्डिले

नांदेड, दि. 11 ऑगस्ट : नांदेड जिल्ह्यात CBG धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विविध विभागांनी परस्पर समन्वय ठेवावा. व्यक्ती अथवा कंपन्यांना प्रकल्प उभारणीदरम्यान कोणतीही अडचण येणार नाही, याची संबंधित विभागांनी काळजी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले.

तसेच, जिल्ह्यात जैवविघटनशील कचऱ्यापासून स्वच्छ ऊर्जानिर्मितीला चालना देण्यासाठी जास्तीत जास्त कंपन्यांनी CBG निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. बैठकीस विविध विभागाचे सदस्‍य असलेले अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने 5 मे 2026 रोजी जारी केलेल्या ‘महाराष्ट्र राज्य कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) धोरण, 2026’ ची नांदेड जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा कॉम्प्रेस्ड बायोगॅस समन्वय समितीची (DBCC) बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली.

या धोरणांतर्गत नागरी सेंद्रिय, कृषी तसेच इतर जैवविघटनशील कचऱ्याचा कच्चा माल म्हणून वापर करून कॉम्प्रेस्ड बायोगॅस निर्मिती करण्यात येणार आहे. कचऱ्याचे विलगीकरण, संकलन व प्रक्रिया करून त्याचे स्वच्छ ऊर्जेत रूपांतर करणे, घनकचरा व्यवस्थापनाला चालना देणे, कचरा विल्हेवाटीसाठी लागणाऱ्या जागेवरील भार कमी करणे तसेच हरितगृह वायू उत्सर्जन कमी करून पर्यावरणाची गुणवत्ता सुधारण्यावर या धोरणात भर देण्यात आला आहे.

CBG प्रकल्पाची किमान कार्यान्वयन क्षमता 20 टन प्रतिदिन (TPD) असणे आवश्यक असून, प्रकल्पांना व्यवहार्यता तफावत निधी (VGF) अंतर्गत प्रति टन कमाल 75 लाख रुपये, तर एकूण मर्यादा 15 कोटी रुपयांपर्यंत राहील.

बैठकीत जिल्हा सह आयुक्त तथा समितीचे सदस्य सचिव यांनी सांगितले की, CBG निर्मितीसाठी देगलूर तालुक्यातील दोन प्रस्ताव कार्यालयास प्राप्त झाले आहेत. या प्रस्तावांच्या अनुषंगाने तसेच जिल्ह्यातील इतर संभाव्य प्रकल्पांना आवश्यक सहकार्य व मार्गदर्शन करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.

00000




No comments:

Post a Comment

  (विधि व न्याय विभाग) हदगाव येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय व सरकारी वकी...