Friday, October 27, 2017

लेख क्र. 15

आरोग्य योजनेत नांदेड अग्रेसर
            देशाच्या आर्थिक व समाजिक उन्नतीमध्ये आरोग्यास अनन्यसाधारण महत्व आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातुन सन 2005 पासुन राज्यात तसेच केंद्रात आरोग्याशी निगडीत अनेक योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार आरोग्यासाठी अधीकची आर्थिक तरतुद केली असून, उपलब्ध सुविधांचे एकत्रिकरण, विविध घटकांचा समन्वय व आरोग्यामध्ये जनतेचा सहभाग वाढवून, आरोग्य सेवांचे बळकटीकरण करण्यात येत आहे.
            राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा उद्देश, विविध आरोग्याच्या योजना प्रभावीवणे राबवून, माता व बालकांच्या मृत्युचे प्रमाण कमी करणे, पोषण व आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी सार्वजनिक सुविधा उपलब्ध करुन देणे, माता व बालकांच्या आरोग्याची काळजी घेणे, एकात्मिक प्राथमिक आरोग्य सुविधांचा वापर वाढविणे, लोकसंख्या स्थिर राखुन, लिंग आणि लोकसंख्येचे प्रमाण समान राखणे, स्थानिक परंपरागत आरोग्य पद्धती सक्षम करणे व आयुषला मुख्य प्रवाहात आणणे हा आहे.
            नांदेड जिल्ह्यात ग्रामीण भागात 65 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 377 उपकेंद्राच्या माध्यमातुन वेगवेगळ्या आरोग्य सुविधा पुरविल्या जातात. त्यानुसार जननी सुरक्षा योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती, जमाती व दारिद्रय रेषेखालील मातांना संस्थेत प्रसुतीसाठी आर्थिक लाभ देण्यात येत असून सन 2016-17 (मार्च 2017 अखेर ) 15 हजार 81 (91 टक्के) मातांना लाभ देण्यात आलेला आहे. यावर्षी जुन 2017 अखेर 1 हजार 685 (10 टक्के) मातांना लाभ देण्यात आलेला आहे.
            कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत सन 2016-17 ( मार्च 2017 अखेर ) 17 हजार 943 (109 टक्के) स्त्री शस्त्रक्रियाचे उद्दीष्ट साध्य झाले असून यावर्षी 872 स्त्री शस्त्रक्रिया (5 टक्के) जुन 2017 अखेर झाल्या आहेत. नांदेड जिल्ह्यात पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेसाठी पुरुषांचा सहभाग वाढणे आवश्यक आहे. यासाठी व्यापक जनजागृती व प्रोत्साहन करण्यात येत आहे.
            संस्थात्मक प्रसुतीसाठी नांदेड जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून मागील चार वर्षात नांदेड जिल्ह्यातील आरोग्य उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय व खाजगी रुग्णालयामधून 95 टक्क्यापेक्षा जास्त प्रसुती या संस्थेमध्ये झाल्या आहेत. मागील वर्षी 2016-17 मध्ये मार्च 2015 अखेर 42 हजार 347 (99 टक्के) प्रसुती या संस्थेमध्ये झाल्या आहेत.
            संस्थेतील प्रसुतीचे प्रमाण वाढविण्यासाठी जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमांतर्गत 102 व 108 टोल फ्री क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचा दृष्य परिणाम दिसून येत आहे. याअंतर्गत 24 तास विविध सेवा पुरवल्या जात आहेत. यामध्ये गरोदर मातांची नोंदणी, तपासणी, औषधोपचार, बाळांतपणे, प्रयोगशाळा तपासण्या, सिझेरियन सेक्शन, रक्त संक्रमण या मोफत सुविधांचा समावेश आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तसेच स्त्री रुग्णालयामध्ये सामान्य प्रसुती झालेल्या मातेस तीन दिवस तर सिझेरियन प्रसुती झालेल्या मातेस 7 दिवस मोफत आहार देण्यात येतो. नवजात अर्भकांना 0 ते 1 वर्षापर्यंत उपचारासाठी दाखल झाल्यास नोंदणी, तपासणी व औषधोपचार या सेवा मोफत पुरविल्या जातात. गरोदर मातांना बाळांतपणाच्यावेळी व अर्भकांना घर ते रुग्णालय, रुग्णालय ते रुग्णालय ( संदर्भसेवेसाठी) आणि रुग्णालय ते घर अशी वाहतुक सेवा मोफत पुरविण्यात येत आहे.
 राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम
            या कार्यक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांच्या व अंगणवाडी बालकांच्या तपासणीसाठी नांदेड जिल्ह्यात 43 वैद्यकीय पथक कार्यरत असून वर्षातुन दोनवेळेस या विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येते, तसेच विविध गंभीर आजारावर औषधोपचार व शस्त्रक्रिया केल्या जातात, सन 2016-17 च्या मार्च 2017 अखेर एकुण 116 विद्यार्थ्यांवर ह्दयशस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
नांदेड जिल्ह्यात टेलिमेडिसीन सेंटर
            टेलिमेडिसीन सेंटर हे उपजिल्हा रुग्णालय हदगाव, गोकुंदा व नांदेड येथे कार्यान्वित असून, याद्वारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद, केईएम मुंबई, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय पुणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर, नानावटी रुग्णालय मुंबई व सर जे.जे. रुग्णालय मुंबई या रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे मार्गदर्शन घेण्यात येते व आवश्यकता भासल्यास संदर्भ सेवा देण्यासाठी संदर्भीत करण्यात येते.
नांदेड जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र अधिक अद्यावत करण्यासाठी दुरावस्था दुर करुन आरोग्य केंद्राच्या सौंदर्यी करण्याकरिता कायपालट योजना राबविण्यासाठी 21 प्राथमिक आरोग्य केंद्रांची निवड करण्यात आली आहे. या नाविन्यपुर्ण योजनेमधून या प्राथमिक आरोग्य केंद्राचे अंतर्गत व बाह्य स्वरुप आरोग्यदायी व आनंददायी बनविण्यात आले आहे.
नाविन्यपुर्ण उपक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्यात डासमुक्त अभियान अंतर्गत गावपातळीवर आरोग्य यंत्रणेमार्फत प्रभाविपणे जनजागरण करण्यात येत असून शोषखड्ड्यांच्या माध्यमातून गावे गटारमुक्त व डासमुक्त करण्यात येत आहेत. या सोबत राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन, क्षयरोग व एड्स नियंत्रण, किटकजन्य आजार व साथरोग नियंत्रण, अंधत्व निर्मुलन, सिकलसेल नियंत्रण, असांसर्गिक आजार प्रतिबंध इत्यादी कार्यक्रमातही नांदेड जिल्ह्याचे कार्य उल्लेखलीनय आहे.
आशा कार्यक्रम
राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत विशेषत: ग्रामीण जनतेला आरोग्य सेवा यशस्वीरित्या आणि सातत्याने मिळाव्या हा दृष्टीकोन समोर ठेवून सर्वांसाठी आरोग्याच्या आशा पुन्हा प्रकाशित झाल्या. ग्रामीण पातळीवर अभियानाचा एक भाग म्हणून प्रत्येक गावामध्ये स्त्री आरोग्य स्वयंसेविका आशाची निवड करण्यात आली असून ही मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्ती आहे. सध्या नांदेड जिल्ह्यामध्ये आदिवासी क्षेत्रामध्ये 215 आशा व बिगर आदिवासी क्षेत्रामध्ये 1 हजार 208 एकुण 1 हजार 423 आशा कार्यकर्ती कार्यरत आहेत.
आरोग्य सेवा पुरविण्यासाठी शासनाच्या विहित 48 निकषांच्या आधारे नांदेड जिल्ह्याने सातत्यपुर्ण प्रगती केली असल्याने राज्य स्तरावर सन 2016-17 मध्ये मार्च 2017 अखेर नांदेड जिल्हा हा आरोग्य विषयक योजना राबविण्यामध्ये 34 जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आला आहे. यापुढेही आरोग्य विभाग आरोग्य सेवा प्रभाविपणे राबविण्यासाठी कटीबद्ध आहे.
 - संकलन जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड
000000


No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1133 नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत  भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी  नां...