अवैध वाळु उत्खनन व वाहतुकीवर
नियंत्रण ठेवावे
--- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांचे
निर्देश
नांदेड, दि. 24:- जिल्हास्तरीय वाळु संनियत्रण समिती बैठक जिल्हाधिकारी
डॉ. विपीन इटणकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांनी जिल्हास्तरीय वाळू संनियत्रण समितीच्या बैठकीमध्ये
अवैध वाळु उत्खनन व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्देश दिले आहेत. यामध्ये
प्रामुख्याने खालीलप्रमाणे निर्देश दिले आहेत.
या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
अशोक काकडे, पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर, जलसंपदा विभागाचे कार्यकारी
अभियंता एस. के. सब्बीनवार, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता गजेंद्र राजपूत, भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे वरिष्ठ भु-वैज्ञानिक, प्रादेशिक परिवहन अधिकारी, व प्रादेशिक अधिकारी,
प्रदुषण नियंत्रण मंडळ, नांदेड इ. उपस्थित होते.
अवैध वाळु उत्खनन व वाहतुकीच्या तक्रारींच्या
अनुषंगाने जिल्हास्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात यावे. या तक्रार निवारण
कक्षामध्ये 24X7 कर्मचारी यांची नियुक्ती करावी. ज्या ग्रामपंचायतीमध्ये अवैध रेती उत्खनन/वाहतुक
होत असेल अशा ग्रामपंचातीच्या ग्राम दक्षता समितीस जबाबदार धरुन त्यांचे विरुध्द
नियमानुसार कार्यवाही अनुसरण्यात येईल. उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलिस अधिकारी
यांचे संयुक्त समिती स्थापन करुन सदरील समितीमार्फत ज्या चौक्या/नाक्यावरुन अवैध
वाहतुक होत असतील अशांची यादी तयार करुन जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याच्या
सूचना दिल्या आहेत. तसेच प्रत्येक चौकीच्या ठिकाणी महसुल, पोलिस व इतर विभागाच्या अधिकारी/कर्मचारी यांच्या नियुक्त्या करुन अवैध
वाहतुक करणा-या वाहनांविरुध्द कार्यवाही करण्यात यावी. तसेच या चौकीच्या ठिकाणी
सीसीटिव्ही कॅमेरा ठेवण्याची व्यवस्था करण्यात यावी. तसेच जिल्हयातील उपविभागीय
अधिकारी व उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी दर आठवडयाला संयुक्त बैठक आयोजित करुन सदरील
बैठकीमध्ये त्यांचे कार्यक्षेत्रात अवैध रेती उत्खनन/वाहतुकीसंदर्भात केलेल्या
कार्यवाही बाबत आढावा घेऊन जिल्हास्तरीय समितीकडे प्रस्तावित करण्यात यावे. महसुल
विभागाचे उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व नायब तहसिलदार व पोलिस
विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस उपनिरिक्षक व सहायक
पोलिस निरिक्षक यांचे संयुक्त भरारी पथके गठीत करण्यात यावे. सदरील पथकामार्फत अवैध
रेती उत्खनन व वाहतुकीच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करणेसंदर्भात निर्देश दिले
आहेत. अवैध रेती उत्खनन व वाहतुकीच्या अनुषंगाने पोलिस व महसुल विभागाने एकत्रित
कार्यवाही करण्यात यावी. तसेच अवैध रेती वाहतुकीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वाहतुक
करत असताना पकडलेली वाहने परिवहन विभागाकडे
मोटार वाहन कायद्यानुसार कार्यवाही करणेसाठी देण्यात यावी. मोटार वाहन कायद्यानुसार सदरील वाहनाची नोंदणी रद्द
करण्याची कार्यवाही करण्यात यावी.
0000
No comments:
Post a Comment