Monday, February 24, 2020


ग्रामीण भागातील शाश्वत विकासासाठी गतिमानता हवी
--- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर
नांदेड, दि. 24:- महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व माजी वरिष्ठ सनदी अधिकारी तथा कार्यकारी संचालक उमाकांतजी दांगट यांच्या उपस्थितीत विभागस्तरीय बैठक घेण्यात आली.
सदरील बैठकीस संबोधताना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर म्हणाले की, ग्राम प्रवर्तक यांनी ग्रामस्थांना शासकीय योजनांची परिपूर्ण व व्यवस्थित माहिती देऊन व शासकीय योजनांचा कृती संगम करून गावाचा विकासात्मक दृष्टिकोन व्यापक करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच पारगमन धोरणानुसार गावातील पूर्ण झालेल्या शासकीय योजना व प्रकल्प शासन प्रचलित नियमानुसार संबंधित ग्रामपंचायतीकडे वर्ग करावेत, तसेच शिल्लक राहिलेली कामे पारगमन प्रक्रियेत पूर्ण करण्यात यावीत. गावाचा सामाजिक व आर्थिक विकास होणेसाठी ग्राम परीवर्तक, संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी शाश्वत विकासाचे धोरण अवलंबून योग्य ती विकासाची दिशा देण्यात यावी, जेणेकरून गावांना सोयीसुविधा उपलब्ध होऊन संबंधित गावे खऱ्या अर्थाने सक्षम बनतील असे सांगितले.
कार्यकारी संचालक तथा माजी वरिष्ठ सनदी अधिकारी श्री दांगट यांनी पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील ज्या ग्राम प्रवर्तकांनी यशस्वीरित्या फेलोशिप पूर्ण केली आहे, अशा ग्राम प्रवर्तकांना त्यांनी मागील तीन वर्षापासून घेतलेल्या अमूल्य अनुभवाच्या आधारे भविष्यातील चांगल्या संधी उपलब्ध करून घ्याव्यात असे सूचित केले. पारगमन ग्रामपंचायतीच्या संदर्भात ग्राम कोष अंतर्गत राबविण्यात आलेले उपक्रम संबंधित ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करावे तसेच शिल्लक असलेल्या निधीचे कामे तातडीने पूर्ण करावीत, अशा सूचना देण्यात आल्या.
या बैठकीमध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी किनवट तालुक्यातील संबंधित पाच गावे गौरी, प्रधानसांगवी, दिगडी, धामदरी, कनकवाडी या ग्रामपंचायतीची सखोल व परिपूर्ण माहिती दिली.
सदरील बैठकीचे प्रास्ताविक व प्रस्तुती नोडल अधिकारी सुपेकर यांनी केली, या बैठकीला मुंबईचे वरिष्ठ अधिकारी दिलीप बायस, मधुकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परभणी व बीड तसेच इतर संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...