वृत्त क्र. 1107
स्वत: ला लोकशाहीचे पाईक समजून संवेदनशीलतेने
मतदान व मतमोजणी कार्य पूर्ण करा : दीपक मिश्रा
विशेष पोलीस निवडणूक निरीक्षकांकडून जिल्ह्याचा आढावा
नागरिकांनी निर्भय होवून मोठया संख्येने मतदानाला यावे
नांदेड दि. 17 नोव्हेंबर : लोकशाही असल्यामुळे आपले अस्तित्व आहे. लोकशाहीसाठी आवश्यक असणाऱ्या निवडणूका निर्भय व पारदर्शी वातावरणात झाल्या पाहिजे. प्रत्येक नोकरदाराने लोकशाही आहे म्हणून आपले अस्तित्व आहे, हे जाणून लोकशाहीचे ऋण चुकविण्यासाठी संवेदनशिलतेने काम करावे, असे आवाहन विशेष पोलीस निवडणूक निरीक्षक दीपक मिश्रा यांनी केले.
विशेष पोलीस निवडणूक निरीक्षकानी आज सकाळी नांदेड व लातूर जिल्ह्याचा आढावा घेतला . या बैठकीला विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, लातूरचे जिल्हा पोलीस अधिक्षक सोमय मुंडे तथा वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची ऑनलाईन पध्दतीने उपस्थिती होती.
पोलीसांचा कॅमेरा आता प्रत्येक ठिकाणी
पुढच्या 48 तासात लोकशाहीचे भविष्य निश्चित होणार आहे. पोलीस विभागासाठी हे 48 तास 24 गुन्हीले 7 लक्ष ठेवण्याचे आहे. तुम्हाला दिलेल्या अधिकाराचा शंभर टक्के वापर करा. शक्य त्या ठिकाणी व्हिडीओ रेकॉर्डिग करा. यामध्ये ईव्हीएम मतदान केंद्रावर पोहोचविण्यासह बुथवरील सुरक्षा व्यवस्थेचेही रेकॉर्डिग ठेवा. प्रत्येक बुथवरच्या पोलीस कर्मचाऱ्यांने किती मिनीटात रिपोर्टीग करायचे, याबाबतची निश्चित कालमर्यादा पोलींग स्टेशन ते वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचा प्रतिसाद कालावधी जितका कमी कराल तीतक्या चांगल्या पध्दतीने कामकाज होईल, असेही त्यांनी यंत्रणेला निर्देश दिले.
मोबाईलला परवानगी नाहीच
मतदानाच्या दिवशी मोबाईलला परवानगी नाही. त्यामुळे आतमध्ये जाऊन होणाऱ्या रेकॉर्डिग व त्यामुळे दाखल होणारे गुन्हे यासंदर्भात कडेकोट पायबंद घाला. शंभर मीटरच्या आतमध्ये मोबाईल किंवा कोणत्याही कॅमेऱ्यावर कोणतेही शुटींग होणार नाही याची काळजी घ्या. 163 कलम याठिकाणी लागली आहे. त्यामुळे सक्तीने वापर करा. केंद्रात प्रवेश करणाऱ्या माणसाला विनाविलंब आतमध्ये प्रवेश करता आला पाहिजे अशा पध्दतीने अनुभवी माणसाची नेमणूक त्याठिकाणी करा. माध्यमासाठी असणाऱ्या निवडणूक आयोगाच्या निर्देशाशिवाय कुठलीही हयगय होणार नाही यासाठी काळजी घ्या.
व्हिलचेअरची संख्या वाढवा
रांगेत उभा राहून, संयम बाळगून, काही वेळ देवून, मतदान करणारा सामान्य मतदाता हा खरा लोकशाहीचा रक्षक आहे. त्यामुळे पोलीस दलासह सर्वानी त्याची विशेष काळजी घ्यावी. ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगाना व्हिलचेअरची सुविधा अधिक चांगल्या प्रकारे मिळेल यासाठी काळजी घ्या. गरज भासल्यास खाजगी स्तरावरुन उपलब्ध करा. प्रत्येक गोष्ट कॅमेराच्या नजरेत राहील यादृष्टीने नियोजन करा.
नागरिकांनो निर्भय होवून मतदानाला या
यावेळी त्यांनी जिल्ह्यातील कडेकोट बंदोबस्त, ठिकठिकाणी नाकाबंदी, निवडणूक कायद्याचे कडक पालन हे सर्व नागरिकांना अतिशय निर्भय, पारदर्शी व सुलभ पध्दतीने मतदान करता यावे यासाठी आहे. पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन सामान्य मतदारांना कोणताही त्रास होवू नये तसेच मतदान प्रक्रीया सुलभतेने पार पाडावी यासाठी झटत आहे. मोठया संख्येने नागरिकांनी मतदानासाठी बाहेर पडावे व लोकशाहीला बळकट करण्यासाठी मतदान प्रक्रीयेत भाग घ्यावा.
00000
No comments:
Post a Comment