Saturday, May 20, 2017

"उज्ज्वल नांदेड" मोहिम विद्यार्थ्यांनी आपलीशी केली
- कार्यकारी संचालक सुरेश काकाणी
नांदेड, दि. 20 :- जिल्ह्यातील युवकांचा प्रशासनातील सहभाग वाढावा, स्पर्धा परीक्षेसाठी त्यांना सक्षम करणे यासाठी सुरु करण्यात आलेली "उज्ज्वल नांदेड" मोहिविद्यार्थ्यांनी प्रतिसाद देऊन आपलीशी केली आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तथा कार्यकारी संचालक सुरेश काकाणी यांनी केले.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सेतू समिती अभ्यासिका, मनपा डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते काल बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील हे होते.  यावेळी कार्यक्रमास पुणे येथील प्रा. मनोहर भोळे, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आउलवार, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे, ग्रंथपाल संजीव कार्ले व आरती कोकुलवार यांची उपस्थिती होती.
            श्री. काकाणी पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षा देवून शासन सेवेत रुजू झाली आहेत. कष्टामुळे त्यांचे भविष्य उज्ज्वल झाले आहे. "उज्ज्वल नांदेड" मोहीम राबविण्यात विद्यार्थी, विषयतज्ज्ञ, अधिकारी, कर्मचारी यांनी दिलेला सहभाग व त्यातून निर्माण झालेला स्नेह सदैव आठवणीत राहील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना विनम्र भावनेने व ज्ञानपिपासूपणे ज्ञान घेऊन आपले भविष्य उज्ज्वल करावे. यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने सेतू समिती अभ्यासिकेत सर्व सुविधा पुरविण्यात येतील, असे अप्पर जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी सांगितले. प्रा. भोळे म्हणाले की, नांदेड जिल्ह्यातील युवकांना स्पर्धा परीक्षेसंबंधी सर्व प्रकारचे मार्गदर्शन करण्यासाठी  सदैव तत्पर असल्याचे सांगितले.
यावेळी वर्ग एक कनिष्ठ स्तर न्यायाधीश या पदी इरफान अली खान यांची निवड झाल्याबद्दल सुरेश काकाणी यांचे हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. इरफान खान, ऐश्वर्या धूत यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. 
प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी केले. त्रसंचालन मुक्तीराम शेळके यांनी तर आभार समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी मानले. संजय कर्वे, कोंडीबा गादेवाद, बाळू पावडे, रघूवीर श्रीरामवार, सुप्रिया धोत्रे, संगीता राठोड, आशा देशमुख, मंगल जाधव, सुप्रिया कार्ले, सुनीता हंद्रे, कुशवर्ता शिंदे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...