Saturday, May 20, 2017

शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी
बँकांनी पीक कर्ज उपलब्ध करुन दयावे
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड, दि. 20 :-  जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामासाठी बँकांनी पीक कर्ज तातडीने उपलब्ध करुन दयावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी आज येथे दिले.
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील निजी कक्षात सर्व बँकेच्या जिल्हा समन्वयकांची बैठक जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक विजय दुर्वे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय उशीर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी. बी. लाडे व बँकाचे जिल्हा समन्वयक आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामात पिकांच्या पेरणी पूर्वी रक्कम मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी बँकांनी दिलेल्या उद्दीष्टानुसार पीक कर्जाचे तातडीने वाटप करावे. कोणताही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. त्यासाठी मेळावे घेऊन पीक कर्ज मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासंदर्भात मार्गदर्शन करावे व शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी केले.
सुशिक्षित बेरोजगार, महिला बचतगटाकडून रोजगार व व्यवसायासाठी तसेच विविध योजनेच्या लाभासाठी कर्जाचे प्रस्ताव बँकाकडे येत असतात. हे प्रस्ताव ही तात्काळ मंजूर करुन त्यांना अर्थसहाय्य उपलब्ध करुन दिले पाहिजे असेही त्यांनी सूचना दिल्या.
केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेअंतर्गत बँकाकडे येणारी कर्ज प्रकरणे त्वरेने मंजूर करण्याबरोबर अर्थसहाय्यही उपलब्ध करुन दिले पाहिजे असे श्री. शिनगारे यांनी सांगितले.
यावेळी पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, पंतप्रधान आवास योजना, महिला स्वयंसहाय्यता बचत गटांना अर्थसहाय्य, मुद्रा योजना, आदी योजना संबंधी बँकांनी केलेल्या कार्यवाहीचा आढावाही घेण्यात आला.
जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय उशीर, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक विजय दुर्वे यांनी पीक कर्ज व आदी योजनेंतर्गत दिलेली उद्दीष्ट व उद्दीष्टपुर्ती केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.

000000

No comments:

Post a Comment

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...