Tuesday, August 13, 2019


आपत्ती व्यवस्थापन आराखड्यांची
अद्यावत माहिती त्वरीत सादर करावी
-         जिल्हाधिकारी अरुण डोंगरे 
नांदेड दि. 13 :- जायकवाडी धरणातील सोडण्‍यात येणाऱ्या विसर्गामुळे जिल्ह्यात पुरापासून नुकसान होणार नाही यासाठी संबंधीत विभागाने आपत्‍ती व्‍यवस्‍थापन आराखड्यांची अद्यावत माहिती जिल्हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कक्षात त्वरीत सादर करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले. 
जायकवाडी धरणातील सोडण्‍यात येणाऱ्या विसर्गामुळे पुरपरिस्थिती निर्माण होऊ नये याकरीता प्रतिबंधीत उपाय योजनेसाठी जिल्‍ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठक कक्षात घेतली. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. डोंगरे बोलत होते.
या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आयुक्त लहूराज माळी, पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर जिल्‍हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, निवासी उपजिल्‍हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी, नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता एस.के.सब्‍बीनवार, जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ.बी.पी.कदम, जि.प.जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ.बी.एम.शिंदे, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी आर.बी.चलवदे, महावितरणचे अधिक्षक अभियंता, संतोष वाहने, प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश प्र.राऊत यांच्यासह तालुकास्तरीय अधिकारी, आदींची यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे म्हणाले, जायकवाडी प्रकल्‍पातील पाणी सोडल्‍यानंतर गोदावरी नदीपात्रापासून बाधीत होणाऱ्या गावांमध्‍ये पुरापासून नुकसान होणार नाही यासाठी येत्या 15 ऑगस्ट रोजी ग्रामसभेत गावकऱ्यांशी चर्चा करुन आवश्‍यक उपाययोजना कराव्यात. मागील पुरामधील उपाययोजनांची माहिती घेऊन तसा आराखडा तयार करावा. पाटबंधारे विभागाने जायकवाडी धरणातून सोडण्‍यात येणाऱ्या पाण्‍याची व किती गावे बाधीत होतील याची माहिती जिल्‍हा व तालुका प्रशासनास दयावी. अन्नधान्य, औषधीचा पुरवठा, आरोग्‍य पथक यासह आवश्यक उपाययोजनांसाठी तत्पर रहावे. स्‍थलांतरीत नागरीक तसेच जनावरांसाठी सुरक्षीत स्‍थळाची पाहणी करुन नदीपात्रात व्‍यक्‍ती, जनावरे वाहून जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. रस्‍ते व पुलाची स्थिती लक्षात घेऊन त्‍याची दुरुस्‍ती करावी. महापालिका, नगरपालिकेच्या अग्निशमक दलाने तसेच महापालिकेने आवश्यक बोटीसह सतर्क रहावे. जीवनरक्षक, पोहणारे व्‍यक्‍ती यांचे पथक गठीत करुन सुरक्षितस्‍थळांचे  नियोजन करावे. पुरामुळे विद्युत पुरवठा बंद करुन पूर ओसरल्‍यानंतर विद्युत पुरवठा सुरु करण्याबाबत दक्षता घ्‍यावी. पूररेषेमध्‍ये असलेल्‍या नागरीकांना सुरक्षितस्‍थळी जाण्‍यासाठी नोटीसा देऊन त्‍यांना सुरक्षितस्‍थळी जाण्‍याच्‍या सूचना द्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी यावेळी दिले.   
अधीक्षक अभियंता श्री सब्‍बीनवार यांनी सद्यस्थितीत जायकवाडी प्रकल्‍पात 90.44 टक्‍के पाणीसाठा असून 1 हजार 500 क्‍युसेक पाणी नदीपात्रात येत आहे. सद्यस्थितीत धोका नाही परंतु यापेक्षा अधिक पाणी जमा झाल्‍यास गोदावरी नदीपात्रात जास्त पाणी येण्‍याची शक्‍यता आहे. जायकवाडीतून पाणी सोडल्‍यानंतर 72 तासात नांदेडला पाणी येण्‍यास वेळ लागतो परंतु हवामान खात्‍याच्‍या सूचनेनुसार आवश्‍यक ती दक्षता घेणे आवश्‍यक असल्‍याचे त्यांनी सांगीतले.
नांदेड शहरातील सखल भाग 11 ठिकाण असून घरामध्‍ये पाणी जाऊन बाधीत होणाऱ्या भागासाठी नियंत्रण कक्ष स्‍थापन करण्‍यात आले आहे. पूर परिस्थितीमध्‍ये सीआरपीएफ मुदखेड तसेच श्री गुरुव्‍दारा लंगरकडून मदत घेण्‍यात येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.  
0000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...