Friday, January 26, 2018

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत
नांदेडच्या 469 कोटीच्या प्रारुप नियोजन आराखड्यास मान्यता
नांदेड दि. 26 :- नांदेड जिल्ह्याच्या सर्वांगिन विकासासाठी सन 2018-19 च्या जिल्हा वार्षिक योजनेच्या 469 कोटी 1 लाख रुपयांच्या प्रारुप आराखड्यास जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
नांदेड येथील कै. शंकरराव चव्हाण नियोजन भवनाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई पवार, आ. अमर राजूरकर, आ. वसंत चव्हाण, आ. सुभाष साबणे, आ. प्रदीप नाईक, आ. नागेश पाटील आष्टीकर, आ. हेमंत पाटील, आ. डॉ. तुषार राठोड, महापौर शिलाताई भवरे, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना, मनपा आयुक्त गणेश देशमुख तसेच समिती सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती.
सन 2018-19 च्या प्रारुप आराखड्यामध्ये सर्वसाधारण योजनेसाठी 235 कोटी 20 लाख, अनुसुचित जाती उपयोजनेसाठी 159 कोटी 3 लाख, ओटीएसपीसह आदिवासी उपयोजनेसाठी 74 कोटी 78 लाख अशा एकुण 469 कोटी 1 लाख रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला आहे. याशिवाय कार्यान्वयीन यंत्रणेच्या मागणी प्रमाणे शासनाने दिलेला नियतव्यय वगळता 415 कोटी 63 लाख रुपयांच्या वाढीव मागणीचा प्रस्ताव राज्यस्तरीय बैठकीत सादर करण्यास नियोजन समितीच्या या बैठकीत मान्यता देण्यात आली. यावेळी सन 2017-18 म्हणजे चालु वर्षातील जिल्हा वार्षिक योजनेच्या पूनर्विनियोजन प्रस्तावासही मान्यता देण्यात आली. माहे डिसेंबर अखेर झालेल्या चालु वर्षाच्या खर्चाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. सरासरी 64 टक्के खर्च झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.
नियोजन समितीच्या मागील बैठकीच्या इतिवृत्तावरील अनुपालन कार्यवाहीचा यावेळी आढावा घेण्यात आला. नांदेड शहरातील स्वच्छतेच्या मुद्यावर बोलतांना पालकमंत्री श्री कदम म्हणाले की, नांदेड शहर स्वच्छ होईल यासाठी महानगरपालिकेने घणकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाच्या कामास सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. यासाठी शासन स्तरावरुन निधी उपलब्ध करुन दिला जाईल. एप्रिल महिना अखेर शहर स्वच्छ झाले पाहिजे. यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा, अशी सुचना करुन त्यांनी दलित वस्ती सुधारणेसाठी दोन वर्षातील निधी आणि कामांची सांगड घालून मार्च अखेर संपूर्ण कामे पूर्ण करण्याचे नियोजन करण्याचे निर्देश दिले. यासाठी मंत्रालय स्तरावर बैठक घेऊन प्रश्न निकाली काढण्यात येईल, असेही ते म्हणाले.
खड्डे मुक्त अभियानाच्या संदर्भात जिल्ह्यात 90 टक्के काम झाले असले तरी उर्वरीत रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामाला गती दयावी आणि मार्च अखेर सर्व रस्ते खड्डे मुक्त होतील याची दक्षता सार्वजनिक बांधकाम विभागाने घ्यावी अशी सुचना करुन पालकमंत्री कदम यांनी जिल्ह्यातील पाणी टंचाई उपाययोजना आणि पाणी पुरवठा योजनांच्या कामकाजाविषयी उपयुक्त निर्देश दिले. जिल्ह्यातील फ्लोराईडयुक्त पिण्याच्या पाणी पुरवठ्याबाबत आणि आठ गावांच्या पाणी पुरवठा योजनेबाबत चौकशी करुन कार्यवाही करण्याच्या सुचना पालकमंत्री यांनी दिल्या. नाविण्यपूर्ण योजनेखाली नियमित स्वरुपाच्या योजना न घेता नवीन वैशिष्ट्यपूर्ण योजनांचा समावेश असावा असे सांगून त्यांनी वृक्ष लागवड मोहिमेच्या कामांचा आढावा घेतांना मोहिमेतील वृक्ष जगवले पाहिजेत असे सांगून वन विभागाने विशेष प्रयत्न करण्याची सुचना केली. उर्दू घराच्या कामाला गती देण्याचा व सर्व सदस्यांना सन्मानपूर्वक निधी वितरण करण्याचा मनोदय पालकमंत्री कदम यांनी व्यक्त केला. यावेळी सर्वसंमतीने पालकमंत्री यांना समान निधी वितरणाचा अधिकार देण्याचा ठराव घेण्यात आला. तसेच पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दलही सर्व संमतीने अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला.
प्लॅास्टीक बंदीचा निर्णय
प्लॅास्टीकच्या वस्तुंचा वाढता वापर आणि विघटन होत नसल्याने प्लॅास्टीकमुळे मोठी हानी होत आहे. मोठ्या प्रमाणात प्लॅस्टीकमुळे आरोग्य धोक्यात येत आहे. यामुळे राज्य शासनाने प्लॅास्टीक बंदीचा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून लवकरच कायदा करण्यात येणार आहे. तरी कायदा होण्यापुर्वीच नांदेड जिल्हा प्लॅास्टीक बंदीमध्ये अग्रेसर राहून शंभर टक्के प्लॅस्टीक मुक्त होईल असा प्रयत्न राहील, असे सांगून पालकमंत्री कदम यांनी सर्व लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी यासाठी पुढाकार घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन केले. तत्पूर्वी त्यांनी जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सुचना दिल्याचेही सांगितले. तसेच प्लॅस्टीकला पर्याय म्हणून कापडी पिशव्या उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था केली जाईल. यासाठी बचतगटांना पिशव्या निर्मितीचे काम दिले जाईल असेही ते म्हणाले.
प्रारंभी जिल्हाधिकारी डोंगरे आणि नियोजन विभागाचे अधिकारी जी. बी. सुपेकर, एस. एस. राठोड, आणि वैशाली ताटपल्लेवार यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
---000---



No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...