वृत्त क्र. 1205
तयारीला लागा यंदा
एमपीएससी मार्फत वर्षेभर परीक्षाच-परीक्षा
नांदेड, दि. 17 डिसेंबर :- राज्य शासनामार्फत यावर्षी मोठ्या प्रमाणात परीक्षा घेतल्या जाणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने यावर्षी होणाऱ्या प्रमुख परीक्षांचे वेळापत्रक जाहिर केले आहे. त्यामुळे शासन सेवेत येण्यास इच्छूक असणाल्या गुणवान, मेहनती व महत्त्वाकांक्षी विद्यार्थ्यांनी तयारीला लागावे. स्पर्धा परीक्षेचे वेळापत्रक नव्या वर्षात तुमची वाट बघत आहे.
नव्या वर्षात 5 जानेवारी रोजी महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पुर्वपरीक्षा होणार आहे. यामध्ये सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, दुय्यम निबंधक श्रेणी-1, मुद्रांक निरीक्षक या पदांचा समावेश आहे. महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पुर्वपरीक्षा 2 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे. उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक, बेलिफ व लिपीक टंकलेखक, सहायक मोटार वाहन निरीक्षक या पदांचा यामध्ये समावेश आहे. 16 मार्च रोजी दिवाणी न्यायाधीश व कनिष्ठ स्तर न्यायदंडाधिकारी या पदासाठीची पुर्वपरीक्षा आहे. महाराष्ट्र नागरी सेवा पुर्व परीक्षा नुकतीच झाली असून 26 एप्रिल रोजी 35 संवर्गातील मुख्य परीक्षा होणार आहे. महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 10 मे, 2025, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 18 मे, 2025, महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 18 मे, 2025 समावेश आहे.
तसेच दिनांक स्वतंत्रपणे
जाहिर करण्यात येणार असलेल्या परीक्षामध्ये महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पुर्व
परीक्षा 28 सप्टेंबर, 2025, राज्यसेवा मुख्य परीक्षा, महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी
सेवा मुख्य परीक्षा, विद्युत अभियांत्रिकी मुख्य परीक्षा, स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य
परीक्षा आदिंचा समावेश आहे. याशिवाय यावर्षेभरात झालेल्या पुर्व परीक्षांच्या सर्व
मुख्य परीक्षा या वर्षेभरात होणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अवर सचिव र.
प्र. ओतारी यांनी कळविले आहे. मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी तयारी करावी, असे आवाहनही
त्यांनी केले आहे. याबाबतची अधिकची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
00000
No comments:
Post a Comment