वृत्त क्रमांक
पूरग्रस्त भागातील तरुणांसाठी नाविन्यपूर्ण ड्रोन पायलट प्रशिक्षण
नांदेड दि. 23 एप्रिल:- पूरग्रस्त भागातील तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी यांच्या विशेष पुढाकारातून एक नाविन्यपूर्ण उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आला. या अंतर्गत दक्षा RPTO, उद्यमिता लर्निंग सेंटर येथे पूरग्रस्त भागातील २० तरुणांना ड्रोन पायलट प्रशिक्षण देण्यात आले.
मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे मुखेड तालुक्यातील अनेक गावे पाण्याखाली गेली होती. या नैसर्गिक आपत्तीमुळे स्थानिक नागरिकांचे जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले. या पार्श्वभूमीवर प्रभावित तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी संस्कृती संवर्धन मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे विशेष पाठपुरावा केला होता. त्यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे हा उपक्रम प्रत्यक्षात साकार झाला.
या प्रशिक्षणामध्ये हसनाळ, रावणगाव, भिंगोली आणि भाटापूर या गावांतील एकूण २० तरुणांनी सहभाग घेतला. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थ्यांना डीजीसीए कडून १० वर्षांसाठी ड्रोन ऑपरेटर परवाना प्रदान करण्यात आला आहे. अशा प्रकारचा नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्ह्यात पहिल्यांदाच घेण्यात आला आहे.
प्रशिक्षणानंतर संबंधित तरुणांना ड्रोन पायलट म्हणून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून, यासाठी त्यांना दक्ष RPTO कडून मार्गदर्शन देखील दिले जाणार आहे. याशिवाय, ड्रोनद्वारे शेती फवारणीसारखा स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्याची संधीही त्यांना प्राप्त झाली आहे.
ग्रामीण भागातील तरुणांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रोजगारक्षम बनविण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा हा विशेष उपक्रम आहे.
00000
No comments:
Post a Comment