Saturday, August 15, 2026

 वृत्त क्रमांक

पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्यांना कर्जमुक्ती प्रमाणपत्रांचे वितरण

नांदेड, दि. १५ ऑगस्ट : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ची नांदेड जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील जवळपास १३ हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून, सुमारे १०६ कोटी २५ लाख रुपये त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते या योजनेच्या जिल्ह्यातील ७ लाभार्थी शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्जमुक्ती (बेबाक) प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

यावेळी पालकमंत्री अतुल सावे यांनी जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ मिळविण्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी तसेच आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन केले. योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक कार्यवाही सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

या निमित्ताने जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांमध्येही कर्जमुक्ती प्रमाणपत्र वितरणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

कार्यक्रमास खासदार डॉ. अजित गोपछडे, महापौर श्रीमती कविता मुळे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, मनपा आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड, भूमी अभिलेख विभागाच्या जिल्हा अधीक्षक सीमा देशमुख, उपजिल्हाधिकारी प्रियंका कर्डिले, जिल्हा शल्य चिकित्सक संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष नवले, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, जिल्हा उपनिबंधक शाहुराज हिरे यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

00000





No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक युवा शक्तीचा संकल्प: स्वच्छ आणि सुंदर भारत माय भारत युवा केंद्र आणि मित्र संस्थांच्या संयुक्त विद्यमाने  ‘स्वच्छता पंधरवडा’ यश...