महत्वाचे वृत्त क्र. 797
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 2 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित ;
25 जनावरे मृत्यूमुखी,एक जण वाहून गेला
· नांदेडमध्ये गोदावरी धोक्याच्या पातळीकडे
· उद्यापासून होणार पंचनाम्याला सुरुवात
· 93 पैकी 45 मंडळामध्ये धो-धो पाऊस
· नांदेड शहरात सरासरी 125 मीमी पाऊस
· पाटबंधारे विभागाची पूर नियंत्रणासाठी पराकाष्ठा
· पालकमंत्र्यांकडून पूर परिस्थितीचा आढावा
नांदेड दि. 2 सप्टेंबर : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. तर शनिवारी 26 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली होती. यामध्ये शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून लागवडीखालील दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातला नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.
25 जनावरे मृत्युमुखी
25 जनावरे मृत्युमुखी पडली असून काही प्रमाणात घरांचेही नुकसान झाले आहे. उद्या पाऊस थांबल्यास शेतीचे व जानमालाच्या नुकसानाचे पंचनामे सुरू होतील असे सुतोवाच जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
नांदेडमध्ये गोदावरी धोक्याच्या पातळीकडे
गोदावरी नदीची नांदेड शहरातील धोक्याची पातळी ३५४ मिटर आहे. संध्याकाळी ८ वाजता ही पातळी ३५२.७५ होती. या परिसरात सतर्कतेचा इशारा दिला आहे. बचाव पथक तैनात असून नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या संपर्कात राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नांदेड,अर्धापूर सर्वाधिक पाऊस
जिल्ह्यात रविवारी दिवसभर पाऊस सुरू होता. काल किनवट माहूर या तालुक्यामध्ये अधिक प्रमाणात झालेला पाऊस आज नांदेड शहर, अर्धापूर, हदगाव, देगलूर, मुखेड, कंधार, लोहा, नायगाव, या तालुक्यावर धो -धो बरसला. अर्धापूर तालुक्यातील अर्धापूर,दभाद, भरड, मालेगाव या मंडळामध्ये सर्वाधिक पाऊस झाला अर्धापूर मध्ये 170 मिलिमीटर पाऊस बारा तासात झाला आहे. तर नांदेड उत्तर व नांदेड दक्षिण दोन्ही भागात सरासरी 125 मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे शहरात सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. दुपारी नांदेड शहराच्या अनेक भाग जलमय झाला होता.गोदावरी नदी काठावरील अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले. वसरणी पंचवटीनगर साईबाबा कमान जवळ एका इमारतीमध्ये दुस-या मजल्यापर्यत पाणी गेले होते. या इमारतीमध्ये अडकलेल्या दोन व्यक्तिना बचाव पथकाने सुखरुप बाहेर काढले.
या पावसाने जिल्ह्यातील 28 कच्च्या घरांचे अंशतः नुकसान केले असून सखल भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. जिल्ह्यातील अनेक नाल्यांना दुपारी पूर आल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला होता रात्री उशिरा पाऊस थांबल्यानंतर मात्र पूर ओसरला. रात्री उशिरापर्यंत संपर्क प्रस्थापित होण्याची शक्यता आहे.
25 जणांची सुटका
आपत्ती व्यवस्थापन विभागाने आज युद्धपातळीवर काम केले.उंचाडा येथे गावाजवळ कयाधु नदीच्या परीसरात जवळपास 25 लोक अडकले होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड कडून राज्य आपत्ती प्रतिसाद दल SDRF ची तुकडी त्या ठिकाणी पाठवून शोध व बचाव कार्य करुन 25 जणांना पुरातुन सुखरुप बाहेर काढले.
एक जण वाहून गेला
तथापि, नांदेड तालुक्यात दुपारी 4 वाजताच्या दरम्यान पासदगाव पुलावरून पाणी जात होते. प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी वारंवार सांगून सुद्धा एका व्यक्तीने प्रशासनाचे काहीच न ऐकता पुल क्रॉस करण्याच्या प्रयत्नात तो वाहून गेला आहे. त्याचा शोध सुरु आहे.
धरणांमध्ये मुबलक साठा
नांदेड जिल्हयातील 2 सप्टेबर रोजी दुपारी ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्प- ईसापुर धरणामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात आले असले तरी धरणाची दारे मात्र उघडलेली नाही. शंकरराव चव्हाण विष्णुपरी प्रकल्प नांदेडची 14 उघडण्यात आली होती. अपर मानार लिंबोटी धरणाची पंधरा पैकी ९ दरवाजे उघडलेले आहेत.लोअर मानार बारुळ धरणाला अॅटोमॅटीक गेट आहेत.त्यामुळे येणारा विसर्ग जशाला तसा पुढे जातो आहे. बळेगाव हाय लेव्हल बॅरेजचे एकूण 14 दरवाजे उघडलेले आहेत. आमदुरा हाय लेव्हल बॅरेजचे सर्व 16 दरवाजे उघडलेले आहेत. बाभळी हाय लेव्हल बॅरेजचे सर्व 14 दरवाजे उघडलेले आहेत. दिग्रस धरणाचे 14 दरवाजे उघडलेले आहे. जायकवाडी पासून बाभळीपर्यत सर्व गोदावरी वरील बंधाऱ्यांचे दार उघडे आहेत.
पालकमंत्र्यांकडून आढावा
राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दुपारी जिल्हाधिकारी व अन्य प्रमुख अधिकाऱ्यांशी संपर्क साधून जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेतला शक्य तेवढ्या लवकर नुकसानीचे पंचनामे सुरू करण्याबाबतचे निर्देश त्यांनी दिले तातडीच्या मदतीला सुरुवात करण्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.
0000
No comments:
Post a Comment