Monday, September 2, 2024

वृत्त क्र. 793

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी

- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 नांदेड, दि. 2  सप्टेंबर :- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी विमा कंपनीस 72 तासाच्या आत नुकसानीची पूर्व सूचना कळवावी असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे. 

नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन ते तीन दिवसापासून अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे नदी नाल्यांना पूर येऊन पुराचे पाणी शेतात शिरून पिके जलमय होऊन, पडलेल्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढून किंवा ओसंडून वाहणारी विहीर इत्यादी कारणांमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. वरील नुकसानीची भरपाई ही पीक विमा योजनेतील स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकाअंतर्गत देण्यात येते. 

वरील कारणांमुळे नुकसान झाल्यास होणारे अधिसूचित पिकांचे नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येते. त्यासाठी शेतकरी बांधवांनी 72 तासाच्या आत विमा कंपनीस पूर्वसूचना देणे आवश्यक आहे. नुकसानग्रस्त विमाधारक शेतकरी यांनी गुगल प्ले स्टोअर वरून क्रॉप इन्शुरन्स हे ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये आपल्या नुकसानीची माहिती भरावी किंवा टोल फ्री क्रमांक 14447 याद्वारे विमा कंपनीस नुकसानीची पूर्वसूचना द्यावी. पूर्वसूचना दिल्यानंतर विमा कंपनी मार्फत किंवा केंद्र शासनामार्फत प्राप्त झालेला डॉकेट आयडी सांभाळून ठेवावा. क्रॉप इन्शुरन्स ॲप मध्ये पूर्वसूचना देताना अतिवृष्टी, जास्तीचा पाऊस या कारणांचीच निवड करावयाची आहे, इतर कारणे नमूद करू नये. 

काही तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी वरील माध्यमांद्वारे विमा कंपनीस पूर्व सूचना देऊ न शकल्यास तालुका प्रतिनिधी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयास किंवा आपल्या गावातील संबंधित कृषि सहाय्यक, तलाठी किंवा ग्रामसेवक यांच्याकडे ऑफलाईन अर्ज सादर करावा, असेही कृषि विभागाने कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...