Friday, July 26, 2019

उत्कृष्ट नियोजनातून वृक्षारोपणाचे उद्दिष्ट पूर्ण करावे - मुख्य वनसंरक्षक प्रकाश महाजन


             
नांदेड दि. 26 :- जिल्ह्यात 33 कोटी वृक्षारोपण मोहिमेत सर्व विभागाने उत्कृष्ट नियोजन करुन दिलेले उद्दिष्ट 30 सप्टेंबर अखेर पूर्ण करावे, असे निर्देश औरंगाबादचे प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक प्रकाश महाजन यांनी दिले.
            सन 2019 च्या पावसाळ्यात 1 जुलै ते 30 सप्टेंबर पर्यंत करावयाच्या 33 कोटी वृक्षारोपण कामांची आढावा बैठक श्री महाजन यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवन येथे आज संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.   
यावेळी औरंगाबाद विभागाचे अप्पर आयुक्त शिवानंद टाकसाळे, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, उपवनसंरक्षक अशिष ठाकरे, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) अनुराधा ढालकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक श्री. महाजन म्हणाले या वृक्षारोपण मोहिमेत प्रामुख्याने ग्रामपंचायत, शाळा, महाविद्यालयामार्फत तसेच पूनर्वसन झालेल्या गावातील जुन्यागावात, नदी-नाल्यांचा काठावर, राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला वृक्षारोपण करावे. महानगरपालिका, जिल्ह्यातील नगरपालिकेद्वारे उत्कृष्ट नियोजन करुन शासनाने सर्व विभाग प्रमुखांना दिलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे. वनविभागाचा 1926 हा नंबर नि:शुल्क असून त्यावर माहिती घेण्याबरोबर आपणास माहिती देता येते.
अप्पर आयुक्त श्री. टाकसाळे यांनी वृक्षारोपण करणे ही जबाबदारी वन विभागाचीच नसून शासनाच्या सर्व विभागाची व जनतेची आहे. उद्दिष्ट समजून काम न करता स्वत:चे कर्तव्य व येणाऱ्या पिढीसाठी वृक्ष लागवड महत्वाची आहे. जिल्ह्यात जमीन चांगली असून पशु, झाडे जगविणे आपले कर्तव्य आहे, असे सांगितले.
जिल्हाधिकारी श्री डोंगरे यांनी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी समजून वृक्षारोपण करुन संगोपन करावे. कार्यालय परिसरातील वृक्षाचे संगोपण व वृक्षांना पाणी देण्यासाठी कर्मचाऱ्यांना जबाबदारी देऊन ती झाडे वाचवावी. यातून कार्यालयाचा परिसर सुशोभनीय ठेवावा, असे सांगितले.  
उपवनसंरक्षक अशिष ठाकरे म्हणाले, या वृक्षारोपन मोहिमेत वनविभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी हे वृक्षारोपण करण्यासाठी सर्व विभागांना सहकार्य करणार आहेत. वन विभागाच्या Maha Forest पोर्टलवर माहिती उपलब्ध असून त्या पोर्टलवर वनविभाग ऑनलाईन नोंदणी करणार आहे. रोपवाटिकेत विविध प्रकारचे निसर्गाला अनुकूल असणारे रोपे असून यंत्रणा व ग्रामपंचायत यांनी पुढाकार घेऊन वृक्षांची जोपासणा करावी. नांदेड शहर व जिल्ह्यात तसेच विद्यापीठ स्वयंसेवी संस्था यांनी पुढाकार घेतला असून त्यांच्यामार्फत वृक्षारोपण व संगोपन करण्यात येत आहे.
ग्रामीण भागात तसेच शहरात रानमळा योजना राबवून जन्म झालेल्या मुलींच्या नावे 10 झाडे तसेच वाढदिवसाच्या निमित्ताने झाडे लावावीत. घरातील विविध प्रसंगाच्या वेळी वृक्षभेट देऊन त्याचे संगोपन करावे. आई-वडिलांची आठवण म्हणून वृक्ष लावावे व त्याचे संगोपन केल्यास गाव वनराई होईल. माय प्लॅन्ट ॲपवर स्वयंसेवी संस्था व नागरिकांना वृक्षारोपण केलेले स्थळ छायाचित्र व रेखांशसह छायाचित्र डाऊनलोड करता  येईल व आपणासाठी या मोहिमेत सहभाग नोंदविता येईल, अशी माहिती दिली.  
औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयाचे वृक्षलागवड सेलचे वनविभागाचे अधिकारी रामचंद्र दावलवार यांनी पाणी व पाऊस कमी असल्यास वृक्ष लागवड कशी करावी याचे प्रात्यक्षि‍क दाखविले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.   
बैठकीस उपविभागीय अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी, विविध विभागाचे विभागीय अधिकारी, वनविभाग व सामाजिक वनिकरणाचे वनक्षेत्रपाल आदी उपस्थित होते.
000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...