Tuesday, April 14, 2020


जिल्हा प्रशासनाच्या तत्पर कार्यप्रणालीमुळे
पर्यावरणाची मोठी हानी टळली
नांदेड दि. 14 :- कोरोना साथरोग नियंत्रण कामात व्यस्त असतानाही जिल्ह्यातील हदगाव व तामसा या हद्दीतील जंगलाला लागलेली आग जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी व  निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्या  तत्परतेने तात्काळ नियंत्रणात आणण्यात यश आले आहे. अन्यथा उन्हाळ्याच्या वाढत्या उष्णतेत या आगीने  मोठे तांडव केले असते व मोठी राष्ट्रीय संपत्ती नष्ट झाली असती.
सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे जंगलातील झाडांचे घर्षण व वातावरणातील उष्णता  यामुळे आग लागण्याचे प्रकार वाढणार आहेत. जिल्ह्यातील हदगाव वनपरिक्षेत्र  व तामसा या हद्दीतील  कॅम्प नंबर 347 (A) येवली गावाजवळील  जंगल क्षेत्रात दि. 13 रोजी दुपारी  आग लागली होती. पाहता-पाहता या आगीने रौद्ररूप धारण केले होते.  हा प्रकार नांदेड येथील आकाशवाणीचे पत्रकार आनंद कल्याणकर यांना त्यांच्या मित्राकडून कळला. त्यांनी लगेच जिल्हाधिकारी कार्यालयात मीडिया कक्षात डॉ. दीपक शिंदे यांना हा प्रकार सांगितला व लवकर उपाय झाले तर बरे होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉ. शिंदे यांनी हा प्रकार  तातडीने निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्या लक्षात आणून दिला.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन, अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना या साथ रोगाच्या नियंत्रणाच्या कामाच्या बैठका
माहितीचे संकलन अशा विविध कामात व्यस्त असतानाही
  डॉ. खल्लाळ यांनी आगीवर नियंत्रण आले नाही तर त्या परिसरातील अनेक झाडे जळून गेली असती व राष्ट्रीय संपत्ती नष्ट झाली असती. सोबतच जंगलातील प्राणी, पशू-पक्षी यांची ही मोठ्या प्रमाणात हानी झाली असती याबाबींचे गांभीर्य ओळखून डॉ. खल्लाळ यांनी वन अधिकारी नांदेड, उपविभागीय अधिकारी भोकर तसेच इतर अधिकाऱ्यांना सूचना दिल्या व तात्काळ आग आटोक्यात आणण्यासाठी काय उपाय योजना करता येतील हे कळवा असे स्पष्ट आदेश दिले.
सोबतच या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे वनपरिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांनी  घटनास्थळी धाव घेतली. वन विभागातील शरयू रुद्रावार, वनपाल खूरसाळे व त्यांच्या इतर साथीदारांनी त्यांची यंत्रणा वापरत या आगीवर दोन ते तीन तासात नियंत्रण मिळवले. जागरुक पत्रकार, तत्पर अधिकारी व झटपट निर्णय यामुळे हे शक्य झाले व जिल्ह्यातील एका वनाचे  व पर्यायाने पर्यावरणाचे संरक्षण झाले.
000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...