Tuesday, October 1, 2024

 वृत्त क्र. 886 

ज्येष्ठांबाबत आपले संस्कार सोडाल तर

मग कायदा आपले कर्तव्य बजावेल -         दलजित कौर जज

 

·  नांदेडमध्ये जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या कार्यक्रमाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

 

नांदेड दि. 1 ऑक्टोबर :- आपल्या संस्कृतीमध्ये पालन पोषन करणाऱ्या वृद्ध आई-वडिलांची, पालकांची, आपल्यावर अवलंबून असणाऱ्या नातेवाईकांची, आप्तस्वकियांची काळजी घेणे हे परमकर्तव्य आहे. पिढ्यांपिढ्या आपण हे कर्तव्य पंरपरेनुसार पार पाडत आलो आहे. मात्र यापासून दूर जाणाऱ्या मुलांनी कायद्याच्या बडग्याने त्यांना सरळ केले जाईल याचा विसर पडू देऊ नये, अशी सूचना जिल्हा न्यायालय नांदेडच्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव दलजित कौर जज यांनी आज येथे केली.

 

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन राज्य सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र ज्येष्‍ठ नागरिक महासंघ (फेसकॉम), मराठवाडा प्रादेशिक विभाग (उ) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा विधी सेवाप्राधिकरणाच्या सचिव दलजित कौर जज बोलत होत्या. कायदा व त्याची अंमलबजावणी ही आपली पंरपरा व संस्कार विसरलेल्या मुलांसाठी आहे, असेही त्यांनी सांगितले.

 

यावेळी व्यासपिठावर निर्मला कोरे, अशोक तेरकर, डॉ. हंसराज वैद्य, अशोक गोडबोले, समाज कल्याण सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे उपस्थित होते. यावेळी बोलतांना श्रीमती जज यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या विविध कायद्यांची माहिती दिली. विधी सेवा प्राधिकरणामार्फत ज्येष्ठ नागरिकांना कोणताही त्रास होत असल्यास कायदेशीर मदत करण्यात येईल, असे त्यांनी वेगवेगळ्या कायद्यांची माहिती सांगून विशद केले. केवळ मुलगाच नव्हे तर नातवांची देखील आजी-आजोबा व ज्येष्ठांची काळजी करणे जबाबदारी आहे. शासनाने अशा परिस्थितीत भरण-पोषणाची योजना म्हणून श्रावणबाळ योजना लागू केली आहे. नांदेड जिल्ह्यातील नागरिकांनी लक्षात घ्यावे की, ज्येष्ठांसोबत स्थानिक न्यायालय प्राधिकरण, पोलीस आणि त्यांचे दायित्व घेण्यासाठी स्वत: जिल्हाधिकारी यांना कायद्याने अधिकार दिले आहेत. त्यामुळे ज्येष्ठांची काळजी घेणे कोणी विसरू नये. यावेळी ज्येष्ठांशी संवाद साधतांना त्यांनी वय कितीही वाढले तरी आपल्या मनातील बालपणाचा उत्साह कमी होऊ देवू नका. तुम्ही समाजाला भरपूर दिले आहे, त्यामुळे स्वत:साठी जगण्याकडे भर द्या, असे आवाहन केले.

 

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी संबोधित करतांना ज्येष्ठांशी कसे वागावे हे आमचे मूल्य शिक्षण आहे. त्यामुळे आपल्या देशात ज्येष्ठांची काळजी तुलनेने खूप चांगल्या पद्धतीने घेतली जाते. आगामी काळात भारतामध्ये ज्येष्ठांची संख्या प्रचंड वाढणार आहे. त्यामुळे जे दवाखान्यात कोणाला जावे वाटत नाही तसेच यापुढे देखील वृद्धाश्रमात कोणाला जावे लागणार नाही, असे समाज मन तयार होणे आवश्यक आहे. मात्र जसे दवाखाने आवश्यक आहेत तसेच वृद्धाश्रमही आवश्यक आहेत. मात्र तिथे जाण्याची वेळ कोणार येऊ नये, असे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी राज्य शासनाने नव्याने सुरू केलेल्या मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनांचा ज्येष्ठांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले. याप्रसंगी निर्मला कोरे, अशोक तेरकर, डॉ. हंसराज वैद्य, अशोक गोडबोले यांनीही आपले विचार व्यक्त केले. ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या, सद्यस्थिती आणि शासन-प्रशासनाकडून असणाऱ्या अपेक्षांवर त्यांनी प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी बापू दासरी यांनी तर आभार प्रदर्शन लक्ष्मी गायके यांनी केले. या कार्यक्रमाला ज्येष्ठांनी मोठ्यासंख्येने उपस्थिती लावली होती.

 

बॉक्स

या कार्यक्रमामध्ये प्रशासनाने ज्येष्ठांसंदर्भात आलेल्या तक्रारीवरून खालील सूचना केल्या आहेत.

· बँकेमध्ये कोणत्याही ज्येष्ठांना ताटकळत उभे रहावे लागणार नाही याची जबाबदारी व्यवस्थापकांनी घ्यावे.

·  एसटीमध्ये व खाजगी बसमध्ये ज्या ठिकाणी ज्येष्ठांसाठी राखीव जागा आहेत त्या जागा त्यांनाच मिळाल्या पाहिजे यासाठी वाहकांने काळजी घ्यावी.

·  पोलीस स्टेशनमध्ये कोणत्याही परिस्थितीत प्रथम ज्येष्ठांच्या तक्रारींना ऐकून घेतले जावे. ठाणेदारांनी तशी सर्वांना सूचना करावी.

00000





















No comments:

Post a Comment

76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात मागील 4 वर्षातील जिल्हा क्रीडा पुरस्काराचे होणार वितरण

  76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात मागील 4 वर्षातील जिल्हा क्रीडा पुरस्काराचे होणार वितरण     नांदेड, दि. 25 जानेवारी :- ...