Tuesday, October 1, 2024

 सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर दि.02, (विमाका) :-    छत्रपती संभाजीनगर विभागात सौर कृषी पंपाचे काम प्रगती पथावर असून विभाग राज्यात अव्वलस्थानी आहे. सौर कृषी पंप या योजनेचा लाभ घेण्यासाठी पाठविण्यात आलेल्या संदेशापैकी अद्यापपर्यंत ५ हजार २१६ शेतकऱ्यांनी लाभार्थी हिस्सा भरणा केलेला नाही. त्यामुळे सबंधित शेतकऱ्यांनी लाभार्थी हिस्सा भरावा व योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय महाव्यवस्थापक विनोद सिरसाठ यांनी केले आहे. ऑनलाईन पोर्टलनुसार प्रथम येणाऱ्या अर्जास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येत असल्याचेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे. 

राज्यातील ज्या शेतकऱ्यांकडे विद्युत जोडणी नाही अशा शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करण्यासाठी महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत पी.एम.कुसुम योजना सप्टेंबर-2021 पासून सुरू करण्यात आली असून योजनेचे सर्व अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत. योजना सप्टेंबर-2021 पासून पुढील पाच वर्ष राबविण्यात येत असून दरवर्षी 1 लक्ष या प्रमाणे 31 मार्च, 2027 पर्यंत 5 लक्ष सौर कृषी पंप आस्थापित करण्याचे उद्दिष्ठ निश्चित केले आहे. यासाठी केंद्र शासनामार्फत 30% तर राज्य शासनामार्फत सर्वसाधारण गटासाठी 60% व अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थ्यांसाठी 65% इतके अनुदान उपलब्ध असून सर्वसाधारण गटासाठी 10% व अनुसूचित जाती व जमाती लाभार्थ्यांसाठी 5% लाभार्थी हिस्सा निश्चित केलेला आहे. शेतकऱ्यांना योजनेचा फायदा होणार असून शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ होण्यासाठी ही योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरेल. 

          छत्रपती संभाजीनगर महाऊर्जा विभागीय कार्यालया अंतर्गत छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी या जिल्हयाचा समावेश आहे. या विभागाचे उद्दिष्ट सन सप्टेंबर-२०२१ ते २०२४-२५ पर्यंत ग्रामीण लोकसंख्यानूसार २८ हजार ५३९ इतके आहे. आजपर्यंत २४ हजार २६० सौर कृषी पंप आस्थापित करण्यात आलेले असुन १७ हजार ९४५ सौर कृषी पंपाचे काम प्रगती पथावर आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर विभाग राज्यात अव्वलस्थानी आहे. तसेच या कार्यालयामार्फत योजनेचा लाभ घेण्यासाठी पाठविण्यात आलेल्या संदेशापैकी अद्यापपर्यंत ५ हजार २१६ शेतकऱ्यांनी लाभार्थी हिस्सा भरणा केलेला नाही. त्यामुळे त्यांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी व योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ऑनलाईन पोर्टलनुसार प्रथम येणाऱ्या अर्जास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येत आहे. 

            वितरीत करण्यात आलेल्या सौर कृषी पंपामुळे विभागातील 1 लाख 25 हजार एकर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. ३१ मार्च २०२५ पर्यंत आणखी 80 हजार एकर क्षेत्र सिंचनाखाली येईल, असे नियोजन आहे. विभागात जास्त प्रमाणात शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी महावितरणमार्फत "मागेल त्याला सौर पंप" या धर्तीवर योजना सुरु करण्यात आली असुन महावितरणमार्फत सौर कृषी पंप योजना सुरु केले आहे. या योजने पासुन शेतकरी वंचित राहु नये यासाठी महावितरण व महाऊर्जा कटिबध्द आहे. अर्जाची संख्या जास्त असल्यामुळे योजनेचा लाभ घेण्यासाठी व अंमलबजावणीसाठी काही काळ लागणार आहे, शेतकरी बांधवांनी सहकार्य करावे, असे आवाहन विभागीय महाव्यवस्थापक श्री सिरसाठ यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.

*****

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...