आंतर जिल्हा वाहतुकीसाठी खाजगी प्रवासी बसेसला
प्रादेशिक परिवहन विभागाची मानके जाहीर
नांदेड (जिमाका) दि. 2 :- राज्य शासनाने मिशन बिगेन अंतर्गत दिनांक 31.08.2020 रोजीच्या जारी केलेल्या आदेशानुसार आंतरजिल्हा प्रवाशांच्या प्रवासावरील निर्बंध दुर करण्यात आले असून आता काही अटी व शर्तीसह प्रवासास परवागी देण्यात आली आहे. या प्रवासासाठी आता वेगळया परवानगीची आवश्यकता नाही. या आदेशात नमूद केल्यानूसार प्रवासी वाहतूक करताना खाजगी प्रवासी बसेस यांना अंमलात आणवयाची मानक कार्यपध्दती (Standard Operating Procedure i.e.SOP) बाबत सुचना पुढील प्रमाणे आहेत. खाजगी प्रवासी बस ऑपरेटर यांनी कोव्हीड-19 महामारीच्या पार्शभुमीवर केंद्र व राज्य शासनाने तसेच परिवहन विभागाने निर्गमित केलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन सहआयुक्त अ. ना. भालचंद्र यांनी केले.
महाराष्ट्र मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 20 (1) (x) मधील
तरतुदीनुसार लोकसेवा वाहनाच्या प्रत्येक चालकाने आपले वाहन स्वच्छ व निर्जंतुकिकरण
केलेल्या स्थितीत ठेवणे आवश्यक आहे. त्यानुसार कंत्राटी बसच्या चालकाने त्यातून
प्रवास करणारा पर्यटक गट बदलताना तसेच प्रवासाच्या प्रत्येक दिवशी प्रवासी बसचे
निर्जंतुकिकरण करावे. तसेच कंत्राटी बसच्या चालकाने प्रत्येक फेरीअंती प्रवासी
बसचे निर्जंतुकिकरण करावे. बसचे आरक्षण
कक्ष, कार्यालय, चौकशी कक्ष यांची वेळोवेळी स्वच्छता करावी.
तसेच सदर ठिकाणी उपस्थित कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावर असताना मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. बसेस जिथे उभ्या राहतात त्याठिकाणी गर्दी होणार
नाही याची काळजी घ्यावी.
मास्क परिधान न केलेल्या प्रवाशांना बसमध्ये प्रवेश देऊ नये. बसचे प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझर ठेवण्यात यावे. तसेच बसमध्ये प्रवाशांच्या वापरासाठी काही अतिरिक्त मास्क ठेवण्यात यावेत. बसमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची थर्मल गनद्वारे तपासणी करण्यात यावी. एखाद्या प्रवाशास ताप, सर्दी-खोकला इ. प्रकारची कोव्हीड-19 आजाराची प्राथमिक लक्षण दिसत असल्यास, अशा प्रवाशांना बसमधून प्रवास करण्यास प्रतिबंध करण्यात यावा. कंत्राटी बस (सिटींग) वाहनांमध्ये प्रवासी एका आड एक पध्दतीने आसनस्थ होतील अशाप्रकारे प्रवासी वाहतुकीस परवानगी असेल. स्लिपर बस वाहनांमध्ये डबल बर्थ वर एक प्रवासी तसेच स्वतंत्र सिंगल बर्थ वर एक प्रवासी याप्रमाणेच वाहतुकीस परवानगी असेल. चालकाने प्रवास दरम्यान जेवण/अल्पोपहार/प्रसाधनगृहाचा वापर या कारणाकरिता बस थांबविताना ही ठिकाणे स्वच्छ आहेत याची खात्री करावी. बसमध्ये चढताना व उतरताना तसेच खानपानाकरिता व प्रसाधनगृहाच्या वापराकरिता प्रवासादरम्यान बस थांबविली असताना प्रवासी शारिरीक अंतर (social distancing) पाळतील याची दक्षता घ्यावी. प्रवाशांना बसमध्ये कचरा फेकू देवू नये. त्यांना कचराकुंडीचा वापर करण्याच्या व बस स्वच्छ राखण्याच्या सुचना द्याव्यात. प्रवासी बसचे निर्जंतुकिकरण करणे तसेच त्याचे अभिलेख ठेवणे याची जबाबदारी परवानाधारकाची असेल.
उपरोक्त सुचनांचे पालन न केल्यास परवानाधारकाविरुध्द मोटार वाहन अधिनियम, 1988, केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989, आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 मधील तरतुदीनुसार उचित कायदेशिर कारवाई करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. केंद्र व राज्या शासनाकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या निर्देशानुसार तसेच प्रशासकीय दृष्टीकोनातून उपरोक्त सुचना/कार्यपध्दतीत आवश्यकतेनुसार सुधारणा करण्यात येईल. सर्व खाजगी प्रवासी बस चालक, मालकांनी याची नोंद घ्यावी, असेही आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे.
000000
No comments:
Post a Comment