Wednesday, September 2, 2020

 

लॉकडाऊच्या कालावधीत अटी व शर्तीसह

30 सप्टेंबरपर्यंत वाढ

 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी प्रतिबंधात्‍मक उपाय योजनेच्‍या अनुषंगाने नांदेड जिल्‍हयात बुधवार 30 सप्टेंबर पर्यंत ताळेबंदीचा कालावधी वाढविण्यात आला आहे. याबाबत जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार आदेश निर्गमीत केला आहे. त्यानुसार नांदेड जिल्हयात 1 सप्टेंबर पासून 30 सप्टेंबर 2020 च्या मध्यरात्री पर्यंत पुढीलप्रमाणे आदेश लागू राहतील.

 

राज्यातील कोविड-19 च्या अनुषंगाने शासनाचे 31 ऑगस्ट 2020 रोजीच्या आदेशान्वये दिलेल्या सुधारीत सुचना व पुन्हा सुरु मोहिमेंतर्गत आदेश परित केलेला असून हा लॉकडाऊन कालावधी  30 सप्टेंबर 2020 रोजीपर्यंत वाढविण्यात आला  आहे. कोविड -19 चे व्यवस्थापनाच्या अनुषंगाने पुढील राष्ट्रीय निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असून पालन न झालेस दंडात्मक, फौजदारी कारवाईस पात्र राहील.

 

सार्वजनीक ठिकाणी, घराबाहेर व घरामध्ये जेथे लोकांचा वावर आहे तेथे असताना चेहऱ्यांचे तोंडावर व नाकावर मास्कचा वापर न करणा-या व्यक्तींवर एक हजार रुपये दंड आकारण्यात येईल. दुकानामध्ये प्रत्येक ग्राहकामध्ये किमान 6 फुट अंतर राहील याची खात्री करावी तसेच दुकानामध्ये  एकावेळी 5 पेक्षा जास्त व्यक्तींना घेणेस मनाई करणेत येत आहे. ग्रामीण व शहरी दोन्ही भागात या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावी. नांदेड जिल्हयातील प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कोणतेही कार्यक्रम आयोजीत करणेस मनाई आहे. परंतू प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर क्षेत्रात खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय / हॉल  सभागृह, घर  व घराच्या परिसरात 50 लोकांच्या (संपुर्ण कार्यक्रमासाठी) मर्यादेत लग्न संबंधित समारंभाचे आयोजन तसेच या कार्यालयाने वेळोवेळी दिलेंले आदेश व अटी व शर्तींचे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक  राहील. अंत्यविधी यासारख्या कार्यक्रमास 20 पर्यंत व्यक्तींना सामाजिक अंतर ठेऊन हजर राहणेस  परवानगी राहील. नांदेड जिल्हयातील कोणत्याही सार्वजनिक अथवा ज्या ठिकाणी लोकांचा वावर जास्त प्रमाणात आहे अशा खाजगी जागेच्या ठिकाणी थुंकण्यास मनाई असून, थुंकल्यास 1 हजार रुपये दंड आकाराण्यात येईल. सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, गुटखा / तंबाखु इत्यादी सेवन करण्यास मनाई करण्यात आली आहे.

 

कामाच्या ठिकाणी पुढील अतिरिक्त निर्देशांचे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक राहील. शक्य असेल त्याठिकाणी घरातुन काम करण्यास प्राधान्य दयावे. कामाच्या आणि व्यावसायाच्या वेळा या कार्यालयामध्ये, कामाच्या ठिकाणी मार्केटमध्ये, औद्योगिक तसेच व्यावसायीक आस्थापनेमध्ये गर्दी होणार नाही, अशा पद्धतीने विभागून दयाव्यात. थर्मल स्कॅनिंग, हॅडवॉश, सॅनिटायझर, याची आत व बाहेर जाण्याच्या ठिकाणी  व्यवस्था करावी. कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक उपयोगाच्या जागा व सामान्य माणसाच्या वापरात येणाऱ्या सर्व जागा व वस्तू यांचे वेळोवेळी सॅनिटायझेशन करण्यात यावे. औद्योगिक व व्यावसायिक आस्थापना यांनी त्यांचे कामगारामध्ये, कामाची पाळी बदलणेचे वेळी, जेवणाचे व इतर सुट्टीचे वेळी, कामावर येताना व कामावरुन सुटतांना शारिरीक अंतर पाळणे बंधनकारक आहे.

 

कंटेनमेंट प्रतिबंधीत क्षेत्रात प्रतिबंधीत क्षेत्र हे Incident Commander  यांना ठरविल्‍याप्रमाणे पुर्वीच्‍या सुचनेप्रमाणेच राहतील. प्रतिबंधीत क्षेत्राबाबत केंद्र शासनाने  व राज्‍यशासनाने पुर्वी दिलेल्‍या सूचना जशास तसे लागू  राहतील.

नांदेड जिल्हा कार्यक्षेत्रात पुढील बाबींना मनाई करण्यात आली आहे. यात सर्व शाळा, महाविदयालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग इंस्टीटयुट हे 30 सप्‍टेंबर  2020 बंद पर्यंत राहतील. परंतू  ऑनलाईन / दुरस्‍थ शिक्षणास परवानगी राहील. चित्रपट गृह, जलतरण तलाव, करमणूक, उदयाने, थिएटर, बार, सभागृह, असेंबली हॉल  यासारख्या इतर सर्व जागा बंद राहतील. रेल्वे व विमान प्रवासी वाहतूक काही ठराविक आदेशाने मान्यता दिली असलेस किंवा STANDARD OPERATING PROCEDURE नुसार चालू राहील. सर्व सामाजिक, राजकिय, क्रिडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर मेळावे तसेच मोठया संख्येने लोक जमा होणारे कार्यक्रम, परिषदा बंद राहतील. या आदेशापुर्वी सर्व अत्‍यावश्‍यक सेवा पुरविणारे दुकाने आस्‍थापना यांना लागू करण्‍यात आलेले आदेश जशास तसे लागू राहतील.

 

नांदेड जिल्हा कार्यक्षेत्रातील पुढीलबाबींना 2 सप्टेंबर पासून परवानगी राहील. सर्व खाजगी आस्‍थापना, दुकाने सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत या वेळेमध्ये चालु रहातील. तर रविवार बंद राहतील. परंतू मेडीकल, औषधाची दुकाने पुर्णवेळ चालू ठेवणेस परवानगी राहील. जर पाच पेक्षा जास्त व्यक्ती दुकानात असल्यास अथवा सामाजिक अंतराचे पालन न केलेस तात्काळ बंद करावीत. सर्व हॉटेल व लॉजिंग यांना पूर्ण क्षमतेने चालू ठेवणेस परवानगी देत आहे. तथापि, शासनाने निर्धारित केलेली आदर्श कार्य प्रणाली (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील. व्यक्ती व वस्तू यांना आंतरजिल्हा हालचालींवर कोणतेही बंधन नाही. अशा हालचालींसाठी वाहने आणि त्यातून प्रवास करणाऱ्या व्यक्तींसाठी स्वतंत्र परवानगी, मान्यता (-पास) परवान्याची आवश्यकता नाही. दिनांक 2 सप्टेंबर 2020 पासून खाजगी बस, मिनी बस व इतर यंत्रणेव्दारे प्रवासी वाहतूकीसाठी परवानगी राहील. तथापि त्याकरीता परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांनी निर्देशित केलेल्या आदर्श कार्य प्रणाली (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील. बाहय शारिरीक क्रियाकलाप (Outdoor Physical Activities) करणेस कोणतेही बंधन असणार नाही.

 

सर्व सार्वजनिक व खाजगी वाहतूकीतील लोकांच्या हालचाली करणेस पुढीलप्रमाणे परवानगी राहील.  टॅक्सी / कॅब/ ॲग्रीगेटर  - फक्त अत्यावश्यक 1+ 3, रिक्षा  - फक्त अत्यावश्यक 1+ 2, चार चाकी-  फक्त अत्यावश्यक 1+3, दोन चाकी  1 +  1  मास्क व हेल्मेटसह प्रवास करताना मास्कचा वापर करणे बंधनकारक असेल.

 

वय वर्ष 65 वरील व्यक्ती, persons with comorbidities, गर्भवती महिला, दहा वर्षा खालील मुले यांनी अत्यावश्यक सेवा व वैदयकीय सेवा वगळता इतर कारणास्तव बाहेर पडण्यास प्रतिबंध राहील. जिल्हयात सार्वजनिक ठिकाणी, लोकांचा वावर असणाऱ्या तसेच वाहतुकीच्या साधनामध्ये मास्‍कचा वापर करणे, सॅनिटायझरचा वापर, शारिरीक अंतर पाळणे बंधनकारक आहे.

 

या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधीतांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांचे विरुध्द मा.  मुख्य सचिव, महसूल व वनविभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनवर्सन, महाराष्ट्र शासन यांचेकडील आदेश क्र.डीएमयु/2020/सीआर.92/डीआयएसएम-1 दि. 31/08/2020 मधील Annexure III मध्ये नमूद केलेप्रामणे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60, व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार तसेच भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय / कायदेशीर कारवाई संबंधित पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी करावी. हा आदेश आज 1 सप्टेंबर 2020 रोजी जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केला आहे.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...