Monday, April 23, 2018


शेतकऱ्यांनी बी.टी.कापूस बियाणे खरेदी करतांना विशेष खबरदारी घ्यावी

---- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे

नांदेड दि. 23 :-  शेतकऱ्यांनी बी.टी. कापूस बियाणे खरेदी परवानाधारक बियाणे विक्रत्यामार्फत करावी. शेतकऱ्यांनी बी.टी.कापूस बियाणे खरेदी करतांना विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केल. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात जिल्हास्तरीय कृषि निविष्ठा सनियंत्रण समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी श्री. डोंगरे बोलत होते.

या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक नईम कुरेशी, कृषि विकास अधिकारी पंडित मोरे, विक्रेते प्रतिनिधी विपीन कासलेवाल, दिवाकर वैद्य, मुकेश गुप्ता तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका कृषि अधिकारी आदि विविध विभागाचे अधिकारी / कर्मचारी यांची यावेळी उपस्थिती होती.  

जिल्हाधिकारी श्री . डोंगरे म्हणाले की, बियाणे खरेदी करतांना विक्रेत्याकडून छापील पक्की पावती घ्यावी. पावतीवर खरेदी दिनांक, बियाण्याचा प्रकार, नाव, उत्पादक कंपनी लॉट नं. , दर रक्कम बरोबर असल्याची खात्री करावी. दुकानदार, विक्रेत्याची सही व खरेदीदार , शेतकऱ्यांनी सही , अंगठा करावा. बियाणे पॅकेटावरील नोंदी व पावतीवरील नोंदी अचूक आहेत याची पाहणी करावी. नामांकित कंपनीच्या कमी कालावधीत तयार होणाऱ्या वाणाची निवड करावी. खाजगी व्यक्ती , एजंट , ओळखीची अथवा अन्य ओळखीच्या व्यक्तीकडून अथवा शासनमान्य नसलेल्या बी.टी. बियाण्याची खरेदी अथवा लागवड करु नये. शासनाने मान्यता न दिलेल्या वाणाची विक्री, खरेदी व लागवडी करु नयेत. अनाधिकृत बी. टी. बियाणाबाबत कृषि विभागामार्फत धाडी टाकण्यात येत आहेत. अज्ञानामुळे शेतकऱ्यांकडून खरेदी, विक्री , लागवड करु नये . तसेच याचप्रकारचे कृत्य बेकायदेशीर असल्यामुळे फौजदारी स्वरुपाची कार्यवाही होवू शकते.

जिल्हाधिकारी श्री. डोंगरे पुढे म्हणाले की, शासनाने बंदी घातलेल्या बी. टी. वाणाची विक्री साठवणूक झालेल्या ठिकाणाची माहिती असल्यास जवळच्या तालुका कृषिअधिकारी अथवा जिल्हा प्रशासन कळवावी. माहिती पुरवणाऱ्या व्यक्तींचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे. तरी आपण सर्वांनी या कामी मदत केल्यास अनाधिकृत बी. टी. बियाणे लागवडीमुळे शेतकऱ्यांचे व पर्यावरणाचे होणारे नुकसान टाळण्यास मदत होणार आहे. तसेच एसटीबीटी हे पर्यावरणास घातक असल्याने पर्यावरणाचा कायदा लागू होतो. त्यामुळे या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यास अजामीनपात्र गुन्हा आहे. गुन्हा सिध्द झाल्यास पाच वर्षाची कैद व एक लाख रुपयांचा दंड अशी कायद्यात तरतुद असल्याने या कायद्याचा कोणीही भंग करु नये. तरी सर्व जनतेने समाजघातक प्रवृत्तीच्या लोकांची माहिती कृषि विभागाकडे कळवावी, असे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी कळविले आहे.   

****

No comments:

Post a Comment

 नांदेड जिल्ह्यातील लोकसभा पोटनिवडणुकीत विधानसभा निहाय झालेल्या मतदानाची एकत्रित अंतिम टक्केवारी मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज. जिल्हाधिकारी अभिज...