Monday, April 23, 2018


प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ्य सुरक्षा मिशन योजना  
30 एप्रिलला ग्रामसभेत माहिती संकलन होणार    
नांदेड दि. 23 :- केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ्य सुरक्षा मिशन योजनेंतर्गत राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा अभियान नांदेड जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी 30 एप्रिल रोजी ग्रामसभेला उपस्थित राहून माहिती संकलित करण्यास सहाय्य करावे, असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले आहे. 
ग्रामसभेस येताना स्वत:चा मोबाईल क्रमांक, शिधापत्रिका सोबत आणणे आवश्यक आहे. त्यामुळे अधिकाधिक कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ्य सुरक्षा मिशन योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेमधील पात्र लाभार्थ्यांना भारतातील कोणत्याही अंगिकृत रुग्णालयात शस्त्रक्रिया व उपचाराच्या माध्यमातून लाभ मिळणार आहे, लाभार्थी यादीत समाविष्ट असलेल्या प्रत्येक कुटुंबाला प्रतिवर्षी 5 लाख रुपयाचे आरोग्य विमा संरक्षण दिले जाणार आहे. यासाठी ग्रामीण लाभार्थी पडताळणी व अतिरिक्त माहिती संकलन मोहिम 15 एप्रिल ते 21 मे 2018 या कालावधीत जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. अतिरिक्त माहिती संकलन मोहिमेत लाभार्थ्यांची पुढील बाबीवरील माहिती आवश्यक आहे. मोबाईल क्रमांक, शिधापत्रिका क्रमांक, कुटूंबाच्या सद्यस्थितीमधील बदल. सोमवार 30 एप्रिल रोजी ग्रामसभेत याद्यांचे वाचन करुन अतिरिक्त माहिती संकलन करण्यात येणार आहे. ग्रामसभेमध्ये उपस्थित न राहणाऱ्या कुटुंबाची माहिती संकलित करण्यासाठी प्रत्येक तालुक्याला ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका, आशा यांची पथके तयार करण्यात आली आहेत. संकलित केलेली माहिती 7 मे 2018 नंतर वेबसाईटवर अपलोड केली जाणार आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.  
000000

No comments:

Post a Comment

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...