Sunday, May 10, 2020


लॉकडाऊनमधील व्यक्तींना मुळगावी जाण्यासाठी
राज्य परिवहन महामंडळाच्या मोफत प्रवास सुविधेकरिता
तहसिलदारांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती
नांदेड, (जिमाका) दि. 10 :-लॉकडाऊनमुळे नांदेड जिल्ह्यातील मजूर, विस्थापीत कामगार, यात्रेकरु, विद्यार्थी व इतर व्यक्तींना त्यांच्या मुळगावी जाण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसच्या मोफत प्रवास सुविधेसाठी संबंधित तहसिलदार यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केली आहे.   
लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या मजूर, विस्थापीत कामगार, यात्रेकरु, विद्यार्थी व इतर व्यक्तींना राज्यांतर्गत व परराज्यातून राज्यात येऊ इच्छिणाऱ्यांना काही अटी व शर्तीवर प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्यात विविध ठिकाणी अडकलेले असतील त्यांना महाराष्ट्र राज्याच्या सिमेपर्यंत घेऊन जाणे व महाराष्ट्रातील रहिवासी असलेले मजूर व इतर नमूद महाराष्ट्र राज्याच्या सिमेपर्यंत आलेल्या आहेत त्यांना त्यांच्या महाराष्ट्रातील जिल्ह्यापर्यंत पोहचविण्याकरिता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मार्फत मोफत पोहचविण्याची सुविधा देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सर्व तहसिलदार यांना त्यांच्या कार्यक्षेत्रासाठी Incident Commander इन्सिडेंट कमांडर म्हणून घोषीत केले आहे. त्यानुसार त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात अडकलेल्या व मुळ गावी जाण्यास इच्छूक असलेल्या परजिल्हा, परराज्यातील मजूर, विस्थापीत कामगार, यात्रेकरु, विद्यार्थी व इतर नागरिक यांच्या नावाची यादी प्रमाणीत करुन एकाच ठिकाणी जाणाऱ्यांची प्रवास निहाय यादी एस. टी. महामंडळाच्या आगार व्यस्थापकाकडे किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या एस. टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तहसिलदार यांना समन्यय अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.
नांदेड जिल्ह्यातील सुद्धा परराज्यात, परजिल्ह्यात अडकलेले वरिलप्रमाणे व्यक्ती मोठ्या प्रमाणात परत येण्याची शक्यता आहे. अशा व्यक्तींच्याबाबत यापुर्वीचे आदेशान्वये नांदेड जिल्ह्यात ग्रामीण, नागरी व औद्योगिक क्षेत्रासाठी ॲन्टी कोरोना कवच / फोर्सची स्थापना करण्यात आली असून परराज्यातून, परजिल्ह्यातील येणाऱ्या नागरिकांपासून कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होवू नये याकरिता घ्यावयाची दक्षता व प्रमाणीत कार्यपद्धती बाबत नमूद करण्यात आले आहे.
त्यानुसार परराज्यातून, परजिल्ह्यातून आलेल्या नागरिकांची वेळोवेळी नजीकच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत वैद्यकीय तपासणी, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्यानुसार अलगीकरण, विलगीकरण करण्याची कार्यवाही व इतर अनुषंगीक आदेशात नमूद कामे करावी व अशा नागरिकांची वेळावेळी यादी करुन नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाचे समन्वय अधिकारी यांच्याकडे पाठवावी.
या आदेशाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने संबंधीत उपविभागीय अधिकारी यांनी पर्यवेक्षन अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडावी. जे कोणी व्यक्ती, समूह या आदेशाचे उल्लंघन करील त्यांचे विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये व भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशात नांदेडचे जिल्हाधिकारी तथा नांदेड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी नमूद केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...