गावनिहाय सूक्ष्म कृती आराखड्यावर भर द्या
- पालक सचिव एकनाथ डवले
· आपत्ती व्यवस्थापन बैठकीत सुरक्षितता व नियोजनाचा आढावा
नांदेड (जिमाका) दि. 8 :- इतर जिल्ह्याच्या तुलनेत नांदेड जिल्ह्यातील भौगोलिक रचना व जैवविविधता वेगळी आहे. गोदावरी, मांजरा, मन्याड, आसना, पेनगंगा व इतर लहान नदी-नाले यांची संख्या अधिक आहे. यामुळे जिल्ह्यातील पर्जन्यमानाव्यतिरिक्त या नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली तर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम नांदेड जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीवर होतो. स्वाभाविकच पाणी वाढल्यामुळे नदी शेजारच्या गावात पूर सदृष्य परिस्थिती निर्माण होते. याला अटकाव करणे आपल्या हातात जरी नसले तरी यात जीवीत अथवा इतर हानी होऊ नये यासाठी अधिक दक्षता व सुक्ष्म नियोजन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याच्या कृषि विभागाचे प्रधान सचिव तथा नांदेड जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले यांनी केले.
नांदेड जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाच्या आढावा बैठक आज जिल्हा नियोजन भवन येथे पालक सचिव एकनाथ डवले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. याबैठकीस जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, उपविभागीय अधिकारी विकास माने, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता बी. के. शेटे व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
आपत्कालीन व्यवस्थापनासाठी इतर सुरक्षिततेच्यादृष्टिने ज्या सेवा-सुविधा आवश्यक असतात तेवढ्याच जिल्ह्यातील विविध सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे अचूक दूरध्वनी क्रमांक, प्रत्येक तालुका निहाय टिमची निवड व परस्पर समन्वय अत्यावश्यक असल्याचे डवले यांनी स्पष्ट केले. यंत्रणातील परिपूर्ण संपर्कासाठी सर्व तालुका प्रमुखांना त्यांनी निर्देश देऊन दक्ष राहण्याच्या सूचना केल्या. पाऊसाळ्यामध्ये केवळ नद्यांनाच पाणी वाढल्यामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते असे नाही. असंख्य भागात लहान-मोठे तलाव जर योग्य स्थितीत नसतील तर त्याची फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. संभाव्य सर्व धोक्यांचा विचार करून त्याचे परिपूर्ण नियोजन हे अत्यंत आवश्यक बाब आहे. आरोग्या पासून ते सुरळीत वाहतुकी पर्यंत, योग्य वेळेला योग्य ठिकाणी संदेश पोहचवून त्या-त्या गावांमध्ये योग्य माहिती पोहचविणे यापासून सर्व गोष्टीचे बारकाईने नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिल्या. आढावा बैठकी नंतर नांदेड जिल्हा प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्थापनासाठी घेतलेल्या विविध उपक्रमांची प्रात्यक्षिकासह माहिती प्रधान सचिवांनी घेतली.
0000
No comments:
Post a Comment