जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह
मुसळधार पाऊस व वादळी वारे वाहण्याची शक्यता
नागरिकांनी सावधगिरी बाळगावी
नांदेड (जिमाका) दि. 19 :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार 19 व 20 जुलै 2023 या दोन दिवसासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. 19 व 20 जुलै 2023 या दोन दिवसांच्या काळात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने केले आहे.
या गोष्टी करा - विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्याने बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.
या गोष्टी करु नका- आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबुमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेवू नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.
0000
No comments:
Post a Comment