Wednesday, July 19, 2023

गोगलगायीचे वेळीच नियंत्रण करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

 गोगलगायीचे वेळीच नियंत्रण करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 19 :- मागील वर्षी सुप्त अवस्थेत गेलेल्या गोगलगायी चालू वर्षातील जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे जमिनीवर आलेल्या आहेत. गोगल गायीच्या प्रादुर्भावामुळे गतवर्षी सोयाबीन पिकाचे नुकसान झाले होते. यावर्षी ते होऊ नये म्हणुन सुप्त अवस्था संपुन जमीनीवर आलेल्या गोगलगायींचे नियंत्रण करणे गरजेचे आहे. गोगलगायीं अंडे टाकण्याच्या अगोदर नियंत्रण केले तर चालु हंगामातील सोयाबीन पिकाचे नुकसान टाळता येईल, असा सल्ला कृषि शास्त्रज्ञांनी दिला आहे.

 

जमिनीतील सुप्तावस्था संपुन वर आलेल्या गोगलगायी पंधरा दिवसात समान आकाराच्या गोगलगायींशी संग करुन पंधरा दिवसानंतर जमिनीच्या खाली प्रत्येक गोगलगाय 100 ते 150 अंडी टाकतात. या अंडयाद्वारे गोगलगायीची पुढील वर्षाची पिढी तयार होते. त्यामुळे अंडी टाकण्याच्या अगोदर जर आपण गोगलगायींचे नियंत्रण केले तर चालु हंगामातील सोयाबीन पिका बरोबरच पुढील वर्षातील सोयाबीन पिकाचे संरक्षण होण्यास मदत होईल. त्यासाठी नियंत्रण हवेसुप्त अवस्थेतील गोगलगायीने डोकेवर काढले आहे. त्यामुळे आताच गोगलगायीचा बंदोबस्त करण्याची आवश्यकता आहे. तरच सोयाबीन व अन्य पिकांचे नुकसान टळेल.

 

गोगलगायीचे एकात्मिक व्यवस्थापन :

 

गोगलगायी सोयाबीन पिकाचे रोप अवस्थेत मोठया प्रमाणात नुकसान करत असल्यामुळे नियंत्रण करणे आवश्यक आहे. सद्या गोगलगायी सुप्त अवस्थेतुन बाहेर आलेल्या आहेत. दररोज सकाळी सहा ते आठच्या दरम्यान बांधाच्या बाजुन आढळून येत आहेत. त्यामुळे गोगलगायीच्या प्रभावी नियंत्रणासाठी गावातील सर्व शेतकऱ्यांनी मोहीम स्वरुपात सकाळी सहा ते आठच्या दरम्यान शेतात जाऊन जमीनीच्यावर आलेल्या गोगलगायी गोळा कराव्यात. गोळा केलेल्या गोगलगायी कुठे न टाकुन देता साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्यात टाकुन नष्ट कराव्यात. गोळा केलेल्या गोगलगायीवर मिठ किंवा चुन्याची भुकटी टाकावी. त्यासोबत सुतळीचे बारदाने गुळाच्या पाण्यात भिजवून आदल्या दिवशी बांधाच्या बाजुने रँण्डम पध्दतीने टाकावे. दुसऱ्या दिवशी सकाळी बारदाण्याखाली जमा झालेल्या गोगलगाई गोळा करुन मिठाच्या अथवा साबणाच्या पाण्यात टाकुन नष्ट कराव्यात. गोगलगायींचा प्रादुर्भाव जास्त क्षेत्रावर झाला असल्यास मेटाल्डीहाईड दानेदार किलो प्रति एकर याप्रमाणे शेतात पसरुन घ्यावे. अशा पध्दतीने गोगलगायीचा एकात्मिक व सामुहीक पध्दतीने नियंत्रण करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहे बऱ्हाटे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

0000

 

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...